मुंबई : म्हाडाने गिरणी कामगारांसाठी गुडन्यूज दिली आहे. पनवेल येथे बांधण्यात आलेल्या २४१७ घरांची सोडत २ डिसेंबरला काढणार आहे.
गिरणी कामकारांसाठी तीनशे वीस चौरस फुटांची घरे असणार आहेत. या घरांची किंमत सुमारे १२ लाख रूपये आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पनवेल तालुक्यातील मौजे कोन येथील २४१७ सदनिकांची संगणकीय सोडत गिरणी कामगारांकरिता २ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी १० वाजता वांद्रे पूर्व येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे.
- एमएमआरडीएतर्फे बांधण्यात आलेल्या प्रत्येकी १६० चौरस फुटाच्या दोन सदनिका (परिस्थितीनुरूप शक्य असलेली जोडघरे) या प्रकारे प्रत्येकी एका युनिटसाठी सहा लाख रुपये आकारून गिरणी कामगारांना वितरित करण्यात येणार आहे.
- सोडत प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेल्या गिरणी कामगार, वारस यांची माहिती म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- या सोडतीमध्ये म्हाडाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या १,४८,७११ गिरणी कामगार, वारस यांच्या यादीमधून २०१२ च्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले अर्जदार, २०१२ च्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांपैकी अंतिमतः अपात्र झालेल्या अर्जदारांऐवजी कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीमधील अर्जदार तसेच म्हाडाच्या मे - २०१६ च्या सोडतीतील यशस्वी अर्जदार या सोडतीतून वगळण्यात आले आहे.
- उर्वरित अर्जदारांचा या सोडत प्रक्रियेत समावेश राहील. स्वान मिल कुर्ला, शिवडी या मिलच्या अर्जदारांना उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात येईल.