www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गिरणी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. भाडेतत्त्वावरील एमएमआरडीए बांधत असलेली ५० टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे १७ ते १८ हजार गिरणी कामगारांना घरे मिळणार आहेत.
एमएमआरडीएने भाडेतत्त्ववरील १ लाख घरे बांधण्याची योजना हाती घेतली आहे. यातील ७० हजार घरांचे बांधकाम सुरू आहे. यातील ५० टक्के म्हणजे ३५ हजार घरे गिरणी कामगारांना मिळणार आहेत. मात्र एमएमआरडीए बांधत असलेले घर १६० चौरस फूटाचे आहे. गिरणी कामगारंना दोन घरे एकत्र करून ३२० फुटाचे एक घर अशी एमएमआरडीएची घरे वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे १७ ते १८ हजार गिरणी कामगारांना ही घरे मिळणार आहेत.
ठाणे, मीरा-भाईंदर, पनवेल, मानखुर्द, पेण या भागात ही घरे आहेत. या घराची किंमत काय असेल यााबतचा निर्णय मात्र अद्याप झालेला नाही. दुसरीकडे मुंबईतील १२ गिरण्यांच्या जमिनीवर घरे बांधण्याचा कार्यक्रम लवकर हाती घ्यावा अशी मागणीही गिरणी कामगार करत आहेत, मात्र त्यासंदर्भातील निर्णय प्रलंबित आहे.
दरम्यान, आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात म्हाडा, मुंबई आणि कोकण मंडळासाठी लॉटरीची घोषणा करणार आहे. यावेळी मुंबईमध्ये ८१४ तर विरारमधील बोळींज इथे सुमारे १ हजार ८०८ घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे.
३१मे च्या लॉटरीसाठी साधारण २४ किंवा २५ फेब्रुवारी म्हाडा जाहिरात काढणार आहे. मुंबईत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन गटासाठी लॉटरी काढली जाणार आहे. तर विरारमध्ये अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी लॉटरी काढणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महागड्या घरांची परंपरा म्हाडाने यंदाही कायम ठेवली आहे. मुंबईत अत्यल्प उत्पन्न गटासाठीच्या विनोबा भावेनगर इथल्या सदनिकेची किंमत ही १५ लाखांच्या घरात आहे.
तर सर्वात महागडे घर शैलेंद्र नगर इथले ८७१ चौरस फुटाचे तब्बल ९५ लाख रुपयांच्या घरात असणार आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षातील लॉटरीला मिळणा-या अल्प प्रतिसादाचा इतिहास बघितला तर यंदाही म्हाडाच्या लॉटरीला कमी प्रतिसाद मिळणार असल्याचं चित्र आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ