पाक कलावंतांच्या मुद्यावर मनसेची माघार; शिवसेना काय करणार?

पाकिस्तानी गायक अदनान सामीला केंद्र सरकारनं अमर्याद काळासाठी भारतात राहण्याची परवानगी दिलीय. या प्रकारानं व्यथित झालेल्या मनसेनं आता पाकिस्तानी कलावंतांना विरोध करण्याची भूमिकाच मागे घेण्याचं ठरवलंय तर दुसरीकडं शिवसेनेची मात्र यावरून चांगलीच कोंडी झालीय.

Updated: Aug 6, 2015, 11:52 AM IST
पाक कलावंतांच्या मुद्यावर मनसेची माघार; शिवसेना काय करणार? title=

मुंबई : पाकिस्तानी गायक अदनान सामीला केंद्र सरकारनं अमर्याद काळासाठी भारतात राहण्याची परवानगी दिलीय. या प्रकारानं व्यथित झालेल्या मनसेनं आता पाकिस्तानी कलावंतांना विरोध करण्याची भूमिकाच मागे घेण्याचं ठरवलंय तर दुसरीकडं शिवसेनेची मात्र यावरून चांगलीच कोंडी झालीय.

अदनान सामी या मूळ पाकिस्तानी गायकाचा भारत वापसीचा मार्ग मोकळा झालाय. केंद्रातल्या भाजपप्रणित सरकारनं त्याला अमर्याद काळासाठी भारतात राहण्याची परवानगी दिलीय. मात्र खरा प्रश्न आहे की, तो मुंबईत बॉलिवूडमध्ये काम करू शकेल का? कारण केंद्रात आणि राज्यात कुणाचीही सत्ता असली तरी मुंबई मायानगरीवर राज्य असतं ते शिवसेना आणि मनसेचं!

पाकिस्तानी कलावंत आणि खेळाडूंना या दोन्ही पक्षांचा विरोध आहे. व्हिसावरून निर्माण झालेला वाद आणि मनसेच्या तीव्र विरोधामुळंच काही महिन्यांपूर्वी अदनान सामी  ला भारत सोडून जावं लागलं होतं. मात्र, आता केंद्राच्या परवानगीमुळं पुन्हा भारतात बस्तान बसवण्यास अदनान सज्ज झालाय. मनसेनं साहजिकच त्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

पाकिस्तानी कलावंतांना विरोध हा शिवसेनेचाही राजकीय अजेंडा आहे. मात्र अदनान सामीप्रकरणी भूमिका घेताना शिवसेनेला कठीण जातंय. प्रदीर्घ कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात नुकतंच दूरध्वनीवरून बोलणं झालं. मध्यंतरी मतभेदांमुळं कमी झालेला संवाद पुन्हा जुळून आलाय. त्यामुळंच अदनान सामीला अनुल्लेखानं मारण्याचा सोपा पर्याय शिवसेनेनं निवडलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.