www.24taas.com,मुंबई
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील१० टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष राहूल शेवाळे यांनी दिलीय.
धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यानं मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं तुडूंब भरलीयत त्यामुळेच पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय झालाय. आता तानसा आणि तुळशी तलावही भरून वाहू लागले. मुंबईच्या पाणीपुरवठय़ाचा ५० टक्क्यांहून अधिक भार उचलणारा अप्पर वैतरणा आणि भातसा तलावही लवकरच भरण्याची शक्यता आहे.
प्रमुख तलावांमध्ये १२ लाख ४० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. पुढच्या पावसाळ्यापर्यंतचे पाणीसंकट टळल्याने पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय शुक्रवारी स्थायी समितीमध्ये जाहीर करण्यात येईल, असे महापौर सुनील प्रभू आणि शेवाळे यांनी तलावांच्या पाहणी दौर्यात सांगितले.