मुंबई : मुंबईतल्या चुनाभट्टी इथं एक धक्कादायक घटना घडलीय. आपल्या पत्नीची छेडछाड करणाऱ्याची एका तरुणानं कोयत्यानं वार करत हत्या केलीय.
चुनाभट्टीतील आझाद गल्लीमध्ये श्रीनिवास लक्का हा तरुण आपल्या पत्नीसोबत राहत होता. सहा महिन्यांपूर्वी तो इथं राहायला आला होता. पण, परिसरात राहणारा मनोज सरकन्या नावाचा गुंड त्याच्या पत्नीची वारंवार छेड काढत होता.
याबद्दल तक्रार केल्यानंतर श्रीनिवासनं सरकन्याला समजावत ताकीददेखील दिली होती... परंतु, सरकन्याची कृत्य काही थांबायचं नाव घेत नव्हती. नव्हे तर तेव्हापासून सरकन्याच्या हरकती वाढू लागल्या.
यामुळे, चिडलेल्या श्रीनिवासनं मंगळवारी सायंकाळी कोयत्यानं सरकन्याच्या मानेवर, हातावर आणि शरीरावर तब्बल १७ वार केले. यामध्ये सरकन्या जागीच ठार झाला.
आपल्या हातून घडलेल्या कृत्याची जाणीव झाल्यानंतर श्रीनिवासन स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांसमोर त्यानं आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी श्रीनिवासला अटक केलीय, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय नायकवाडी यांनी दिलीय.