नागपूर : मुंबईत झालेला दारुण पराभव हा काँग्रेस पक्षाचा किंवा काँग्रेसच्या उमेदवारांचा नाही तर हा पराभव आहे संजय निरुपम यांचा... अशा शब्दांत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी पराभवाचं खापर पक्षाच्या मुंबई अध्यक्षावर फोडलंय. ते नागपूरमध्ये बोलत होते.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असतानाही ढिसाळ कारभार तसंच नियोजन शून्य कारभार यामुळे हा काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागल्याचं राणेंनी म्हटलंय.
जनतेनं दिलेल्या कौलानंतर सत्ता स्थापनेत मुंबईत सेनेला मदत करण्याबद्दल काँग्रेस हायकमांड निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मुंबईत सर्वात जास्त म्हणजेच 84 जागा शिवसेनेला मिळाल्यात. त्यापाठोपाठ भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादीला 10, मनसेला 7 आणि इतर 14 जागांवर निवडून आलेत.
सेनेला जास्त जागा मिळतील असे वाटले होते परंतु तसं घडलं नाही, असं म्हणत त्यांनी आपला अंदाज चुकल्याची स्पष्टोक्ती दिली. निवडणुकीतील प्रदर्शनाकरता त्यांनी भाजपाचं अभिनंदनही केलंय. सोबतच, या निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा वापर झाल्याचं म्हणत त्यांनी भाजपवर टीकादेखील केली.
दरम्यान, संजय निरुपम यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. तसंच 'आपल्याच पक्षातील लोकांनी जाणून-बुजून आपल्याला हरवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले... काही लोकांनी जाणून बुजून शिवसेना किंवा भाजपच्या लोकांच्या सांगण्यावरून पक्षाच्या कामकाजाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं खूप उघडपणे सुरू होतं... आणि याची माहिती मुंबईपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच होती' असं नुकतंच निरुपम यांनी म्हटलं होतं.