विधानपरिषदेत तडजोड; राष्ट्रवादी 'जागा'हट्ट सोडणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील छुप्या तडजोडीबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

Updated: Aug 16, 2014, 11:49 AM IST
विधानपरिषदेत तडजोड; राष्ट्रवादी 'जागा'हट्ट सोडणार? title=
फाईल फोटो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील छुप्या तडजोडीबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेऊन राष्ट्रवादीपुढे काँग्रेसने माघार घेतली. मात्र, या माघारीमागे जागा वाटपात काँग्रेसचा वरचष्मा राहिल अशी तडजोड काँग्रेसने केल्याचं समजतंय. जागावाटपात निम्म्या जागांवर ठाम असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आता हा आग्रह सोडणार असल्याचं समजतंय.

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमने-सामने होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे दोन्ही पक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम होते. राष्ट्रवादीने तर थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रिंगणात उतरवून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळेच काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने सुरू केला. काँग्रेसनेही आपला उमेदवार मागे घेताना राष्ट्रवादीबरोबर तडजोड करण्याचा प्रयत्न केला आहे.

या तडजोडीनुसार विधानसभा जागावाटपात राष्ट्रवादीने जास्त जागांचा आग्रह धरू नये, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं समजतंय. 

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 124 ते 130 जागा सोडायला काँग्रेस तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानपरिषदेची उमेदवारी मागे घेण्यासाठी या दोन्ही पक्षात तडजोड झाल्याचं पक्षाचे नेते मान्य करत आहेत. मात्र, ही तडजोड काय आहे हे मात्र ते आत्ताच सांगायला ते तयार नाहीत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने निम्म्या म्हणजेच 144 जागांसाठी आग्रह धरला होता. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 114 तर काँग्रेसने 174 जागा लढवल्या होत्या. यावेळी 114 वरून थेट 144 जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आत्ताआत्तापर्यंत प्रयत्नशील होती. 

काँग्रेस, मात्र एवढ्या जागा सोडायला तयार नाही. राष्ट्रवादीने आपला हा हट्ट सोडावा यासाठी काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवल्याचे समजते. दोन्ही पक्षांनी सध्या गुलदस्त्यात ठेवलेली ही तडजोड जागा वाटपावेळी निश्चितच समोर येईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.