मुंबई: स्वबळाची भाषा करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही सत्ताधारी पक्ष आगामी विधानसभा निवडणुका आघाडी करूनच लढवणार, हे आता स्पष्ट झालंय... जागावाटपाचा फॉर्म्युलाही दिल्लीश्रेष्ठीच ठरवणार असल्यानं, एकमेकांविरूद्ध दंड थोपटणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांची भाषाच बदलून गेलीय.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा दोन जागा जास्त काय मिळवल्या, राष्ट्रवादीनं दबावतंत्र सुरू केलं. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी हा खटाटोप सुरू झाला.
स्वबळाची भाषा कशासाठी?
-२००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 174 तर राष्ट्रवादीने 114 जागा लढवल्या होत्या.
-मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला निम्म्या म्हणजेच १४४ जागा हव्या आहेत. तर राष्ट्रवादीला एकही जागा वाढवून द्यायला काँग्रेस तयार नाही.
मग काय, प्रत्येक जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते बाह्या सरसावून निम्म्या जागांची मागणी करायचे. अन्यथा स्वबळावर लढण्याची भाषा सुरू करायचे..
काँग्रेसचे 'जशास तसे' उत्तर
राष्ट्रवादीच्या या दबावाला काँग्रेसनं अजिबातच भीक घातली नाही. काँग्रेसनंही त्याच ताकदीनं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसच्या नेत्यांनीही स्वबळाची भाषा वापरण्यास सुरूवात केली.
आता नेते मवाळ का झाले ?
दोन्ही नेत्यांच्या तोंडी भाषा आघाडी तोडण्याची असली तरी जास्तीत जास्त जागा पदरात पडाव्यात, यासाठीच हा दबाव टाकला जात होता. मात्र आता सोनिया गांधी आणि शरद पवारांनीच आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब केल्यानं, दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भाषा काहीशी मवाळ झालीय.
विधानसभा निवडणुकीत आघाडी झाली नाही तर लोकसभा निवडणुकीतील पराभवाची पुनरावृत्ती होईल, अशी भीती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते आहे. त्यामुळं स्बबळाची भाषा सोडून आता दोन्ही पक्षांनी जागा वाटपाची चर्चा सुरू केली आहे.या चर्चेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी टिकवण्यासाठी एक एक पाऊल मागे घ्यावं लागणार आहे हे मात्र निश्चित...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.