www.24taas.com, मुंबई
केंद्र शासनातर्फे देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड देण्यात येत आहे. आधार कार्डच्या नोंदणीसाठी खासगी संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोंदणीनंतर अनेकांना वेळेवर कार्ड मिळत नसल्याची स्थिती आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनातर्फे इंटरनेटवरून दोन रुपयांत आधार कार्डची प्रिंट उपलब्ध करून दिली जाणार आहे.
गेल्या वर्षांपासून आधार कार्डसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नोंदणीसाठी शहरी व ग्रामीण भागात खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजन्सीमार्फत छायाचित्र काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे; परंतु नागरिकांनी आधार कार्डसाठी नोंदणी केल्यानंतरही अनेक महिने त्यांना कार्ड मिळत नाही. यासंदर्भात काही नागरिकांनी तक्रारीदेखील केल्या आहेत.
या तक्रारींची दखल घेऊन शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी इंटरनेटच्या माध्यमातून आधार कार्डची प्रिंट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्याद्वारे नागरिकांना आधार कार्डची प्रत दिली जाणार आहे.
ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा, प्रिंटर्स उपलब्ध नाही त्यांना महा ई-सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, संग्राम केंद्रातून केवळ दोन रुपयांत आधार कार्डची प्रिंट उपलब्ध करून घेता येणार आहे. ज्यांच्या आधार क्रमांकाची निर्मिती झालेली नसेल किंवा ज्यांना आधार पत्राच्या छापील प्रतीची आवश्यकता नसेल त्यांच्याकडून दोन रुपये घेतले जाणार नाही.