www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दादरमधील प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी राज्य सरकारला बजावलेय की, दादर ऐवजी विक्रांतला हेरिटेजचा दर्जा द्या! देशाची गौरवशाली युद्धनौका आयएनएस विक्रांत लिलावात काढण्यात येण्याचे संकेत मिळताच. तिचे जतन व्हावे, अशी राज यांची इच्छा आहे.
राज ठाकरे यांनी दादर हा मनसेचा मतदार किल्ला व्हावा यासाठी लक्ष घातले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विक्रांतला वाचविण्याबरोबर दादरवासीयांच्या प्रश्नांना हात घातला आहे. त्यामुळे राज यांनी `विक्रांत बचाव`चा नारा दिल्याची कुजबूज आहे.
भारतीय नौदलातील पहिलीवहिली विमानवाहू नौका आणि काही वर्षांपूर्वी संग्रहालयात रुपांतरीत झालेल्या आयएनएस विक्रांतच्या लिलावाची घोषणा नौदल दिनाच्या पूर्वसंध्येला झाली आणि सारेच हळहळले. विक्रांत या नौकेवर वस्तूसंग्राहालय करावे, अशी मागणी होती. मात्र, राज्य शासनाने पैसे नाही म्हणून हात वर केलेत. दरम्यान, ऐतिहासिक विक्रांत बचावासाठी अनेक नौदलप्रेमी, विक्रांतप्रेमी, इतिहासप्रेमींनी आपापल्या परीनं मोहीमही सुरू केली आहे.
दरम्यान, भाजपनं विक्रांतच्या लिलावाला विरोध केला आहे. घोटाळ्याचे पैसे वसूल करून विक्रांतचं जतन करावं, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी लावून धरली आहे. त्यानंतर आज राज ठाकरे यांनीही सरकारला विक्रांत मोडीत न काढण्याचं आवाहन केलं. दादर हेरिटेजला विरोध होत आहे. शिवसेनेने याचं खापर राज्य शासनावर फोडलंय. जयंत पाटील यांनीही विरोध केलाय. आता राज ठाकरे यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे दादरचा प्रश्न राजकीय पटलावर आलाय.
दादरच्या शिवाजी पार्क परिसराला हेरिटेज दर्जा देण्याचा विषय गेले काही महिने चांगलाच रंगलाय. स्थानिक रहिवाशांचा या प्रस्तावाला साफ विरोध आहे. या पार्श्वभूमीवर, दादरला हेरिटेज दर्जा देण्याऐवजी विक्रांतला हेरिटेज करावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. मात्र, विक्रांतचा लिलाव होणारच, आमचा निर्णय बदलणार नाही, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळे राज यांच्या भूमिकेनंतर बदल होईल का, अशी चर्चा आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ