विषारी दारू नव्हे हे तरी पोलिसांच्या 'हफ्तेखोरी'चे बळी!

मालाड मालवणी विषारी दारू प्रकरणातल्या बळींची संख्या ८४ वर पोचलीय. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं खरोडी गावात सध्या शोककळा पसरलीय.

Updated: Jun 21, 2015, 03:24 PM IST
विषारी दारू नव्हे हे तरी पोलिसांच्या 'हफ्तेखोरी'चे बळी! title=

मुंबई : मालाड मालवणी विषारी दारू प्रकरणातल्या बळींची संख्या ८४ वर पोचलीय. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं खरोडी गावात सध्या शोककळा पसरलीय.

या प्रकरणात मालाड मालवणीतल्या मृतांचे नातेवाईक खरे बळी ठरलेत... पण, ते विषारी दारूचे नव्हे तर ते बळी ठरलेत पोलिसांच्या 'हफ्तेखोरी'चे...

दीड वर्षांच्या ओमचे वडील हरी विषारी दारूचे बळी ठरलेत. हरी या कुटुंबातला कमावणारा एकमेव सदस्य होता. त्यामुळं गेल्या तीन दिवसांपासून या घरातली चूलही पेटलेली नाही. दारूपायी आपली पत्नी आणि या चिमुरड्याला सोडून हरी मरण पावला. 

गुरुवार सकाळपासून मालाड मालवणी भागातल्या खरोडी गावात असं मृत्युचं तांडव सुरू झालंय.  बुधवारी रात्री इथल्या लक्ष्मीनगर झोपडपट्टीत मिळणारी दारू इथल्या स्थानिकांनी प्यायल्यानंतर तासातासाला इथल्या बळींचा आकडा वाढत चाललाय. 

याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. मालाड मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह ८ जणांनाही निलंबित करण्यात आलय. ५ दारू विक्रेत्यांना अटक झालीय.  

पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या संगनमतानंच दारुचा खुलेआम धंदा सुरू असल्याचं इथले नागरिक सांगतात. 

महाराष्ट्रात सध्या १९४९ चा दारुबंदी कायदा अस्तित्वात आहे. त्यानुसार अवैध बनवणे आणि विक्री केल्यास जास्तीत जास्त ७ वर्षं सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद आहे. गुजरात सरकारनं याच कायद्यात सुधारणा करून मृत्युदंडाची तरतूद केलीय. महाराष्ट्र सरकार या कायद्यात सुधारणा करणार का? असा प्रश्न आता विचारला जातोय.

दरम्यान, मालवणीतल्या या घटनेला आता ४८ तासाहून अधिक काळ उलटल्यावर राजकराण्यांना जाग आली. सकाळी खासदार गोपाळ शेट्टींनी दौरा केला. त्यानंतर संध्याकाळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे या भागात पोहचले. कुटुंबांची चौकशी केली. त्यानंतर ५ वाजता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मालवणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला... आणि आर्थिक राजधानी हातभट्ट्या चालतातच कशा असा प्रश्न उपस्थित केला. तर तिकडे जळगावात मुख्यमंत्र्यांनी कठोर करावाईचं आश्वासन दिलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.