www.24taas.com, मुंबई
‘मी बोलेन तर फक्त मराठीत, इतर भाषांमध्ये नाही’, असं एकेकाळी बिनदिक्कतपणे म्हणणाऱ्या राज ठाकरेंना आता मात्र संवाद साधण्यासाठी अन्य भाषांची मदत घ्यावी लागलीय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांची ‘मराठी’वादाची भूमिका... सगळ्यांच्याच परिचयाची... ‘परप्रांतियांना मराठी येत नसेल तर शिकून घ्या’ असा सज्जड दम भरणाऱ्या राज ठाकरेंनी आता मात्र हिंदीतून बोलणं पसंत केलं. एक इंग्रजी न्यूज चॅनलला मुलाखत देताना त्यांनी चक्क हिंदी भाषेचा वापर केलाय. आझाद मैदानावरील रझा अकादमीच्या मोर्चात उसळलेल्या दंगलीनंतर राज ठाकरेंनी भव्य दिव्य असा मोर्चा काढून सरकारचा आणि परप्रांतियांचा समाचार घेतला. बिहारच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या पोलिसांवर अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतल्यावर राज ठाकरेंनी ‘महाराष्ट्राच्या पोलिसांवर अपहरणाचे गुन्हे दाखल झाले तर महाराष्ट्रातील बिहारींना घुसखोर ठरवून हाकलून लावू’ असं म्हणत पुन्हा एकदा आपला मुद्दा अधोरेखित केला. याचवेळी हिंदी चॅनेल्सनं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असं सांगणंही ते विसरले नव्हते. याचवेळी इंग्रजी वाहिन्यांना इथल्या बातम्यांचं काही देणं-घेणं नसतं असंही त्यांनी म्हटलं होतं.
२००८ नंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना हिंदीत मुलाखत दिली नव्हती. निवडणूका काळात तर हा जोर आणखी वाढला. इंग्रजी वाहिन्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मराठीत उत्तरं देऊन आपला मराठी बाणा त्यांनी यावेळी दाखवला. पण यावेळी मात्र त्यांनी एका इंग्रजी चॅनलला हिंदीतून मुलाखत दिलीय. परप्रांतियांच्या मुद्यावर आपलं म्हणणं योग्य पद्धतीनं मांडलं जावं, असं आता राज यांना वाटतंय. त्यामुळेच आपण हा हिंदीतून दिल्याचंही त्यांनी सांगितलंय.