मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे. आज सायंकाळी गिरगाव चिराबाजार येथे प्रचाराची पहिली सभा होतेय.
मराठी भाषिकांचा बालेकिल्ला गिरगाव येथून शिवसेनेचा प्रचार सुरु होतोय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराच्या पहिल्या सभेत नेमके कुठले मुद्दे घेतात याकडे लक्ष असणार आहे.
भाजप सोबत असलेली युती तोडल्यानंतर शिवसेना भाजप मध्ये जणू धर्मयुद्धालाच सुरुवात झालीये. त्यामुळे शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपचा उद्धव ठाकरे नेमका कसा समाचार घेतात याबाबत उत्सुकता आहे.
तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीसाठी पाठवलेला प्रस्ताव आणि तो फेटाळला गेल्यानंतर शिवसेनेवर केलेल्या टिकेलाही उद्धव ठाकरे कसे प्रत्त्युत्तर देतात याकडे लक्ष असणार आहे.
मुंबई महापालिका निवणुकीत सर्वाधिक कसोटी आणि अस्तित्वाची लढाई शिवसेनेची असल्याने उद्धव ठाकरे यांच्या तब्बल 18 जाहीर सभांचे आयोजन करण्यात आलंय. या सभांमधून ते संपूर्ण मुंबई आणि उपनगरे पिंजून काढणार आहेत. प्रचाराच्या समारोपाची सभा वांद्रे येथील बीकेसी संकुलात होणार आहे.