मुंबई : राज्यभरातले एसटी कर्मचारी पगार वाढीच्या मागणीसाठी संप पुकारलाय. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना पंचवीस टक्के पगार वाढ मिळावी यासाठी सर्वात मोठी संघटना इंटक आज बेमुदत संपावर गेलीय.
या संपामुळे राज्यभरातल्या एसटी डेपोंमध्ये गाड्या बाहेरच पडलेल्या नाहीच. रोज पोटापाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या लाखो प्रवाशांना या संपाचा फटका बसतोय. शेतकऱ्यांप्रमाणे चालक-वाहकही कर्जबाजारी आहेत. त्यामुळे त्यांच्या आत्महत्या सुरू झाल्यात असा कर्मचारी संघटनेचा आरोप आहे.
एस. टी. कर्मचाऱ्यांचा २०१२-१६ या वर्षांसाठीचा कामगार करार रद्द करून एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर गेले. एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी आज संपाचे हत्यार उपसताच त्याला मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीडमधील कर्माचाऱ्याने एसटी डेपोमध्ये गाड्या उभ्या करुन संपाला पाठिंबा दर्शवला. औरंगाबादमधील सिडको आणि मुख्य बसस्थानकातील एसटी डेपोतील बहुतांश कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला.
राज्यभरात एसटीचे १ लाख १६ हजार कर्मचारी असून आजचा संप हा इंटकच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेश व तेलंगणा एस. टी. कर्मचाऱ्यांना ४४ टक्के पगारवाढ देण्यात आली आहे. तर मग महाराष्ट्रातील एस. टी. कर्मचाऱ्यांना पगारवाढ का नाही, असा सवाल एसटी कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.