मुंबई : मध्य रेल्वेवरील महत्वाचे स्टेशन परळ. या स्टेशनचा विस्तार करुन टर्मिनस उभारण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. मात्र, हालचाली होत नव्हत्या. आता परळ टर्मिनससाठी हालचाली सुरु झाल्यात. याबाबत निविदा १५ दिवसांत खुल्या होणार आहेत, अशी माहिती पुढे येत आहे.
दादरवर प्रचंड ताण येत असल्याने दादरचा भार हलका करण्यासाठी परळ टर्मिनसचा विचार पुढे आला. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला (पाचवी-सहावी मार्गिका) या प्रकल्पाचा भाग म्हणून परळ टर्मिनसचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून येत्या १५ दिवसांत निविदा खुल्या होणार आहेत.
मध्य रेल्वेवरील दादर स्थानकातील गर्दी आणि परळ स्थानकातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून मध्य रेल्वेने परळ येथून उपनगरीय गाडया सोडण्याची योजना आखली होती. त्यासाठी परळ टर्मिनसचा ८० कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. मात्र या प्रकल्पाबाबत दोन वर्षे काहीच निर्णय झाला नव्हता. आता केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लक्ष घातल्याने परळ टर्मिनसच्या हालचाली सुरु झाल्यात.
टर्मिनससाठी नविन काय?
- परळ स्थानकातील दक्षिण दिशेचा पादचारी पूल एल्फिन्स्टन रोड रस्ते पुलाशी जोडणार.
- प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला आणखी एक प्लॅटफॉर्म बांधणार
- नविन प्लॅटफॉर्ममुळे परळ लोकलची व्यवस्था शक्य.
- मुंबईहून येणाऱ्या गाड्या एल्फिन्स्टन रोडच्या बाजूला टाकण्यात येणाऱ्या नव्या मार्गिकेवरून धावतील.
- सध्याचा दादरच्या दिशेकडील पादचारी पूल पश्चिम दिशेला उतरवणार.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.