मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाआधी होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. तर मंत्रिमडळाच्या विस्तारावरून शिवसेनेची नाराजी पुन्हा एकदा पुढे आलीय.
भाजपकडून मुद्दाम विस्ताराला उशीर केला जात आहे, अशी टीका उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे. आज भाजप आणि घटकपक्षांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत विस्ताराची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाआधी होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. मंत्रीमंडळ विस्तारामध्ये कोणत्याही विद्यमान मंत्र्याला वगळण्यात येणार नसल्याचंही त्यांनी म्हटलय. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
विस्ताराबाबत कोणत्याही घटक पक्षाची नाराजी नसून विस्ताराबाबत आज सर्व घटक पक्षांची मुंबईत एकत्रित बैठक होणार आहे. येत्या २५ तारखेला प्रदेशाध्यक्षांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार असल्याच त्यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.