मुंबई : मुंबई म्हटलं की समोर येतात ते धावणारी लोकं. मग ते लोकल पकडण्यासाठी असो, बस पकडण्यासाठी असो किंवा मग टॅक्सी पकडण्यासाठी असो. मुंबईत अनेक ठिकाणी शेअर टॅक्सी सुरु झाल्या आहेत त्यामुळे मुंबईकरांना ऑफिसात पोहोचण्यासाठी त्याची बरीच मदत होते. लोकं अगदी नियमित रांगा लावून या टॅक्सीमध्ये बसतात.
मुंबईत जर तुम्ही महालक्ष्मी स्थानकापासून महालक्ष्मी मंदिरात जाण्याचा प्लान करत असाल तर मात्र तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. तुम्हाला स्थानकापासून टॅक्सी तर मिळेल पण बसण्यासाठी जागा मात्र कमी मिळेल कारण येथे टॅक्सीमध्ये अक्षरश: कोंबून माणसे भरले जातात. मागे जेथे 3 माणसं बसतात तेथे हे टॅक्सीवाले 4 माणसं बसवतात. हे तर काहीच नाही जेथे चालकासोबत एक व्यक्ती बसतो तेथे हे 2 माणसं बसवतात. आता ही लोकांची मजबुरी म्हणायची की आवड हे त्यांनीच ठरवावं. कारण कोणीही या विरोधात कधी आवाज उठवलेला अजून तरी ऐकण्यात आलेलं नाही.
टॅक्सीवाल्यांना याचा दुप्पट फायदा... पेट्रोल पण वाचतं आणि पैसे ही जास्त मिळतात. 15 रुपये सीट प्रमाणे 6 सीटचे होतात 90 रुपये. महालक्ष्मी स्थानक ते मंदिर अंतर हे ट्रॅफिक असेल तर 10 ते 15 मिनिटं आणि नसलं तर 5 ते 7 मिनिटं. आता यामधून टॅक्सी चालकांना किती फायदा होतो हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. पेट्रोल वाचतं, एका ट्रिपमध्ये जास्तीत जास्त लोकं जातात हे सगळं ठिक आहे हो पण नियमांची पायमल्ली होतेय याचं काय... ? आता अशा प्रकारे नियम मोडण्यासाठी जबाबदार धरायचं तरी कोणाला... टॅक्सी चालकांना की हे सगळं सहन करणाऱ्या लोकांना...? आता हे ट्रॅफीक पोलिसांसमोर होत नसेल असं तर नाही... पोलिसांसमोरचं टॅक्सीत माणसं भरली जातात. पोलिसांना जर हे माहित आहे तर ते याकडे दुर्लक्ष का करतायंत ? अशा टॅक्सी चालकांवर कारवाई का करत नाही ? हाच खरा प्रश्न आहे.