दिनेश दुखंडे, मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम जसा सर्वसामान्यांवर होतोय, तसा तो राजकीय नेत्यांच्या दैनंदिन कार्यक्रमांवरही होतोय. मोठ्या गाजावाजात सुरु झालेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे शाखा भेटींचे दौरे, त्यामुळे काही दिवसांतच गुंडाळावे लागल्याचं चित्र आहे.
मोदींचा नोटाबंदीचा निर्णय आणि यासाठी देशाला घातलेली साद सध्या भारतभर गाजतेय. काहींनी तिचा धसका घेतलाय, तर काहींना तिचं कुतूहल वाटतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पाचशे आणि एक हजारच्या नोटबंदीच्या निर्णयाच्या सर्जिकल स्ट्राईकने राजकीय पक्षही गारद झालेत. उल्लेख करायचा झाल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं उदाहरण यासाठी देता येईल.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मोठ्या जोशात कामाला लागले होते. आपापल्या शाखा, स्थानिक पक्ष कार्यालयांना भेटी द्यायलही त्यांनी सुरुवात केली होती. त्यामुळे सहाजिकच कार्यकर्त्यांमधेही उत्साह संचारला होता. दिवाळीपूर्वी हाती घेतलेलं हे मिशन आता मात्र पुरतं थंडावलंय. यामुळे महापलिका निवडणुकीच्या व्यूहरचना आखणीला खिळ बसलीय.
बँकांबाहेरच्या लांबलचक रांगांमधे राजकीय पक्षांचे नेते दिसत नसले तरी कार्यकर्ते मात्र आहेत. त्यामुळे शाखांमधे भेटणार तरी कोण? असा प्रश्न नेत्यांना पडला असावा. आता या निर्णयाच्या लोकप्रियतेची लाट लवकरात लवकर ओसरावी, अशी प्रार्थना राजकीय पक्षांची नेते मंडळी मनोमनी करत असावीत.
पण सावधान... 30 डिसेंबरनंतर मोदी आणखी एक नवा धमाका करणार आहेत अशी चर्चा आहे.