मुंबई : 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचं स्पष्ट केलंय.
आज सामनामध्ये उद्धव ठाकरेंच्या दीर्घ मुलाखतीचा शेवटचा भाग छापण्यात आलाय. त्यात गेली २५ वर्ष युती सडली... आता स्वबळीची तयारी सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. पण सरकारमध्ये राहून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न होणार असेल, तर सरकारमध्ये रहाण्यात स्वारस्य नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
महाराष्ट्रात शिवसेनेला कालच्या जूनमध्ये पन्नास वर्षे झाली. पन्नास वर्षांतली पंचवीस वर्षे आमची जवळपास युतीमध्ये गेली. पंचवीस वर्षे हा फार मोठा काळ झाला. दोन पिढ्यांचा काळ झाला. पंचवीस वर्षे आम्ही युतीचं राजकारण एकमेकांना सांभाळत सांभाळत केलं. एकमेकांचा हात पकडूनच पुढे गेलो. -
शिवसेनेने ऐन उमेदीची पंचवीस वर्षे युतीमध्ये घालवली. शिवसेनाप्रमुखांबरोबर तेव्हा सगळे टोलेजंग नेते होते. महाराष्ट्र ठामपणे शिवसेनाप्रमुखांच्या पाठीशी उभा राहिला तो हा काळ. पण ही चांगली पंचवीस वर्षे दुर्दैवाने युतीमध्ये सडली!
यावेळी प्रथमच शिवसेना एकट्याने एकहाती विधानसभा लढली, पण हे झालं शेवटच्या पंधरा दिवसांत. तोपर्यंत युतीच्या चर्चेचं गुर्हाळ चालूच होतं. शिवसैनिक तसा भोळाभाबडा. पण एकदा चिडला की तो चिडला. त्याने एकदा आपलं मानलं की आपलं मानलं. त्यालाही असं वाटलं होतं की, युती तुटणार नाही. म्हणजे जे काही आमचे मतदारसंघ आहेत तेथेच आपल्याला श्रम करावे लागतील. कित्येक ठिकाणी तर शिवसेनेची तयारीसुद्धा नव्हती. तरीसुद्धा शिवसैनिकांनी मोठ्या वादळाला टक्कर दिली.
सध्या एक अशी फॅशन झाली आहे की, चिखल उडवायचा आणि पळून जायचं. भ्रष्टाचारामुळे ज्यांना पराभव पत्करावा लागला ते लोक म्हणजे या सरकारच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचं प्रदर्शन भरवणार आहेत. अरे, आधी तुमची लायकी काय? तुमची तोंडं काळी झालीत भ्रष्टाचारानं. ती तुम्ही पुसलीत का? कोणत्या तोंडानं तुम्ही बोटं दाखवताय? आणि आरोप करून पळून जाणं हे काही जबाबदार विरोधी पक्षाचं काम नाही.
शिवसेना – भाजपची युती होण्याला शिवसेनाप्रमुखांचं हिंदुत्वावरील आवाहन कारणीभूत ठरलं, मग प्रमोदजी महाजन यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांना युतीचे शिल्पकार म्हटलं जातं. तसं मला वाटतं. आता खडसेंना काय म्हणतात ते मला माहिती नाही. युती तोडण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. त्यामुळे प्रमोद महाजन युतीचे शिल्पकार, तर हे महाशय युतीचा भंगकार!