मुंबई: आघाडीचा निर्णय होण्याआधीच काँग्रेसनं ११८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या यादीत दोन मंत्र्यांची नावं नाहीत. दोन मंत्री वगळता बहुतांश मंत्र्यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलंय. पण पाच विद्यमान आमदारांच्या पत्ता कापण्यात आलाय.
वादग्रस्त कृपाशंकर सिंह यांना मात्र पुन्हा कलिनामध्ये तिकीट देण्यात आलंय. अहदमनगर शहर मधून बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दहिसरमधून शीतल म्हात्रे, मलबार हिलमधून महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नवापूरमधून स्वरुपसिंग नाईक यांना उमेदवारी मात्र विद्यमान आमदार शरद गावित हे सपाच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. या जागेवरुन दोन्ही काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. शिवाजीराव निलंगेकर यांच्या ऐवजी अशोक पाटील निलंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलीय.
विद्यमान आमदारांचा पत्ता कट
विद्यमान आमदार दक्षिण नागपूरचे आमदार दिनानाथ पडोळे यांचं तिकीट कापण्यात आलंय. त्यांच्याऐवजी सतीश चतुर्वेदी यांना तिकीट देण्यात आलंय. गडरचिरोलीचे आमदार नावदेव उसेंडी या विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलंय.
तर कऱ्हाहाड दक्षिणचे आमदार विलास काका उंडाळकर यांचंही तिकीट कापण्यात आलंय. तिथून मुख्यमंत्री स्वतः रिंगणात उतरणार आहेत. लातूर ग्रामीणचे आमदार वैजनाथ शिंदे यांचाही पत्ता कापलाय. साक्री मतदार संघातले विद्यमान आमदार योगेंद्र भोये यांचंही तिकीट कापण्यात आलंय.
या दोन मंत्र्यांची नावं काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाहीत
संजय देवतळे आणि शिवाजाराव मोघे यांची नावं पहिल्या यादीत नाहीत. त्याचबरोबर काही दिग्गज नेत्यांच्या मुलांची नावंही पहिल्या यादीत नाहीत. यवतमाळमधून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे इच्छुक आहेत. मात्र पहिल्या यादीत यवतमाळचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे हे कणकवलीमधून इच्छुक आहेत. मात्र त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.