www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील असून राज्यातील महिला भगिनींनी एका बॉक्समध्ये बांगड्या भरून त्यांना पाठवाव्यात. जेवढे जास्त बॉक्स जातील तेवढी लाच वाटून तरी ते राजीनामा देतील, असा सणसणीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज लगावला.
काल मुंबईत एका प्रशिणार्थी महिला पत्रकारावर सामुहीक बलात्कार झाला. या प्रकरणी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील सर्व पक्षांना माझे आवाहन आहे, महाराष्ट्रातील जनतेला माझे आवाहन आहे. आज व्यक्ती बदलणं गरजेचं आहे, उद्या सरकार बदलणं गरजचं आहे. परंतु, ही व्यक्ती आत्ताच बदलणं गरजेचं आहे. त्या शिवाय हे वठणीवर येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडणुकीला जिवंत राहा, मग मरा
महाराष्ट्रातील जनतेचा रेटा जोपर्यंत यांच्या मागे लागणार नाही तो पर्यंत यांना काही वाटणार नाही. हे रोजचं आहे. तुम्ही जगा किंवा मरा याचं काही देणं घेणं नाही. निवडणुकीच्या दिवसापर्यंत जीवंत राहा. मतदान केल्या केल्या मेलात तरी चालेल. असल्या वृत्तीची माणसं संपूर्ण महाराष्ट्र चालवत आहे. लाज वाटते आज. दाभोलकरांसारखी व्यक्ती गेली आज बलात्कार उद्या काय होईल सांगता येत नाही.
खोटा पोलिस कमिशनर ऑफिसमध्ये
आज मी कुठेतरी वाचलं की खोटा पोलीस पोलिस कमिशनर ऑफीसमध्ये गेला होता. त्या ठिकाणाची रेकी करून आला. अरे पोलीस कार्यालय इथे सुरक्षित नाही तर आम जनतेचं काय. महाराष्ट्रातील आणि मुंबईतील पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. की ते असले प्रकार सर्व बंद करू शकतात. बंद करण्यासाठी प्रमुख म्हणून जो माणूस लागतो तो जर आर. आर. पाटलांसारखा असेल तर पोलीस तरी काय करतील.
आर. आर. पाटील कुरिअर सेवा
शरद पवार स्वतःहून आर. आर. पाटील यांना का हटवत नाही. यावर राज ठाकरे म्हणाले, तो पवारांच्या विश्वासातील माणूस आहे ना. महाराष्ट्रातील गोष्टी पवारांना केंद्रात कोण सांगेल. त्यामुळे या माणसाला या पदावर ठेवले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.