बिबट्याची ओळख पटायचेय, प्रधान वनसचिवांचे उत्तर

चंद्रपूर जिल्ह्यातल्या नरभक्षक बिबट्याची ओळख पटली नसल्याचा दावा राज्य सरकारचे प्रधान वनसचिव प्रवीण परदेशी यांनी केलाय. चंद्रपुरातल्या वनात सध्या या नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरुच आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 22, 2013, 10:56 AM IST

www.24taas.com,चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातल्या नरभक्षक बिबट्याची ओळख पटली नसल्याचा दावा राज्य सरकारचे प्रधान वनसचिव प्रवीण परदेशी यांनी केलाय. चंद्रपुरातल्या वनांत सध्या या नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरुच आहे.
या बिबट्याने आतापर्यंत ७ जणांचे बळी घेतलेत. या बिबट्याला ठार मारण्यासाठी वनविभागाने ६ शार्प शूटर्स असलेली पथके तैनात करण्यात आलीत. मात्र या नरभक्षक बिबट्याची पुरेशी ओळख पटली नसल्याचं वनसचिवांनी सांगितलंय. त्यांनी चंद्रपूरमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी हे हल्ले करणारा बिबट्या एकच नाही असे विसंगत विधान त्यांनी केलंय. त्यामुळं वनाधिका-यांमध्ये एकवाक्यता नसल्याचं स्पष्ट झालंय. शिवाय या बिबट्याने ६ ग्रामस्थांना ठार मारल्याची कबुली त्यांनी दिलीय. पहिल्या हल्ल्यातील बिबट्याला वनांत सोडताना केंद्र सरकारच्या वन्यजीव विषयक सर्व नियमांचे पालन केल्याचा दावा वनसचिवांनी केला.

ताडोबाच्या जंगलाशेजारी नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी तैनात असलेल्या शार्प शूटर्सच्या सहा टीम्सला बिबट्याने
चकवा देत पुन्हा हल्ला चढवला होता. यात वायगाव इथं बिबट्यानं पहाटे केलेल्या हल्ल्यात ५० वर्षीय यादव लाटेलवार गंभीर जखमी झालेत. चांदापूरचा राहणारा यादव लाटेलवार आपल्या एका नातेवाईकाकडे वायगावला आला होता. पहाटेच्या सुमारास गावावळच बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला.
नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचा सरकारने आदेश दिल्यानंतर गुरुवारी रात्रीपासून शार्प शूटर्सच्या ६ टीम्स ताडोबाच्या जंगलात गस्त घालताहेत. मात्र या नंतरही नरक्षक्षक बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत ७ लोकांना आपला जीव गमवावा लागलाय तर ३ जण गंभीर जखमी झालेत. या घटनेनंतर परिसरात पुन्हा एकदा भितीचं वातावरण पसरलंय.