www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमधल्या लाचखोर अभियंत्यांची राज्यभरात मालमत्ता असल्याचं उघड झालंय. सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांच्या मालमत्तेच्या मोजणीतून दोघांच्याही नावावर कोट्यवधींचं घबाड असल्याचं समोर आलंय. या दोघांनी जमवलेल्या काळ्याकमाईचा तपास अद्याप सुरूच असून त्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
नाशिकमधले लाचखोर अभियंते अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आणि त्यानंतर समोर आलं ते त्यांनी बेकायदेशीररीत्या जमवलेलं कोट्यावधींचं घबाड... सतिश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांच्या मालमत्तेचा आकडा आता कोट्यावधींपर्यंत गेलाय. आत्तापर्यंतच्या मोजणीत चिखलीकरकडे १४ कोटी २८ लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागीने मिळाले आहेत. शिवाय त्याच्या नांदेडच्या घराची किंमत २३ लाख ७१ हजार इतकी आहे. इतकंच नाही तर चिखलिकरनं त्याच्या साडूच्या नावावर अहमदनगर, नांदेडमधल्या तरोडा, औरंगाबादमधल्या मुकुंदनगरमध्ये शेत, घर, प्लॉट अशी मालमत्ता खरेदी केल्याचंही उघड झालंय. याशिवाय परभणी, जालना, लातूर, नवी मुंबई, पुणे या ठिकाणीही त्याची मालमत्ता आहे. तसंच धुळ्यातील एका व्यक्तीच्या नावे त्याने इनोव्हा गाडीही घेतल्याचं उघड झालंय. चिखलीकरच्या ७८ फाईलींची चौकशी पूर्ण झालेली असून मालमत्तेच्या २७ फाईलींची चौकशी सुरू आहे.
लाचखोर जगदीश वाघ याच्या संपत्तीचा तपशीलही लाखोंच्या घरात आहे. आत्तापर्यंत जगदीश वाघ याच्याकडे ४७ लाख रुपये रोख, जवळपास १ किलो ११७ ग्रॅम सोनं, ८ लाख रुपयांची मुदतठेव आणि प्लॉटचे कागदपत्र मिळाले आहेत. चिखलीकरप्रमाणेच वाघ यानेही रोनाल्ट पल्स ही महागडी गाडी धुळ्यातील एका व्यक्तीच्या नावावर खरेदी केल्याचं उघड झालंय.
या लाचखोर अभियंत्यांनी जमवलेली ही संपत्ती वाचता वाचता तुम्हाला धाप लागली असेल तरी त्यांची संपत्ती इथेच संपत नाहीए... या लाचखोर अभियंत्यांनी कमवलेल्या या काळ्या कमाईचा तपास अजूनही सुरूच आहे. त्यामुळे या लाचखोरीच्या संपत्तीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.