www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
प्रशांत दामलेंचा नाशिकमध्ये प्राध्यापक वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मात्र या जाहीर कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी नाशिक महापालिकेच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले.
नाशिक दौ-यावेळी येणा-या अडचणींचा पाढाच्या पाढा त्यांनी वाचला. झी २४ तासनं नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर स्पेशल सीरीज करत हे सगळं अधोरेखित केलं होतं. पण तरीही काहीही सुधारणा झाली नाही. आता प्रशांत दामलेंच्या या रोखठोक वक्तव्यानंतर तरी महापालिकेला जाग येते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
कलाकारांचं मराठी रंगभूमीशी असणारं अतूट नातं नाशिकमध्ये पुन्हा एकदा दृढ झालं. तात्यासाहेब शिरवाडकर, प्रध्यापक वसंत कानेटकर यांच्या कर्मभूमीत त्यांच्याच नावाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं मधुकर तोरडमल, ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर आणि सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचा सन्मान करण्यात आला.
तीस वर्षांच्या कारकीर्दीत नाशिकरांकडून पहिल्यांदाच कौतुकाची थाप मिळाल्याबद्दल प्रशांत दामले यांनी नाशिककरांचे आभार मानले. मात्र त्यानंतर प्रशांत दामले नाशिक महापालिकेच्या कामकाजावर चांगलेच बरसले. ३० वर्षांच्या कारकीर्दीत जवळपास ५०० नाट्यप्रयोग नाशिकच्या कालिदास कलामंदिरात सादर करण्यात आलेत. मात्र पहिल्या प्रयोगापासून आजपर्यंत कुठलीच सुधारणा दिसत नसल्याची नाराजी दामले यांनी व्यक्त केली.
दामलेंची ही टीका नगरसेवकांनी गांभीर्यानं घेतल्याचं सध्या तरी दिसतंय. नाशिकमध्ये याआधी शिवसेनेची सत्ता होती, आता मनसेची आहे. दोन्ही पक्ष मराठी अस्मितेच्या नावखाली राजकारण करण्यात दंग असतात. मात्र मराठी रंगभूमीची सेवा करण्यात दोन्हीही पक्ष कमी पडलेत. कलाप्रेमी असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये असतानाच प्रशांत दामले यांनी नाशिक महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढल्यानं आता राजसाहेब काय फर्मान सोडतात याकडे नाशिककर आणि कलाप्रेमींचं लक्ष लागलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.