www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
निफाडचे शिवसेना आमदार अनिल कदम यांनी अत्यंत अर्वाच्य भाषेत टोल नाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आहे. नाशिक- धुळे महामार्गावर पिंपळगाव टोल नाक्यावर ही घटना घडली आहे. या टोलनाक्यावरील सर्व कर्मचारी महिला आहेत.
आमदार कदम यांना टोलची पावती फाडण्यास सांगितल्याचा राग आला आणि त्यांनी महिला कर्मचाऱ्य़ांना आई-बहिणींवरून शिव्या देत थेट कपडे उतरवण्याची धमकी दिली. आपल्या सांगण्यावरून जर गाडी सोडली नाही, तर कर्मचारी महिलांना कपडे उतरवायला लावेन अशा गलिच्छ शब्दांत महिलांना धमकी दिली.
पिंपळगाव येथील टोलनाका हा २४ तास महिला चालवत असलेला महाराष्ट्रातला एकमेव टोलनाका आहे. या टोलनाक्यावर आमदार अनिल कदम यांना पावती फाडल्यास सांगितल्याचा राग येऊन आमदारांनी थेट खालच्या पातळीवरील भाषा वापरत शिवीगाळ केला. आपण आमदार असल्याचा माज दाखवत आणि महिलांशी असभ्य प्रकारे बोलत या आमदाराने टोलनाका तोडण्याचा कार्यकर्त्यांना आदेश देत आमदार निघून गेला.
टोलनाक्यावरील सुरक्षा यानंतर जरी वाढवण्यात आली असली, कर्मचारी महिला सध्या या मदारांच्या दहशतीखाली आहेत. घडल्या प्रकाराबद्दल आमदार अनिल कदम यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. याउलट, महिलांनीच आपल्याला शिवीगाळ करायला सुरूवात केल्याचं आमदार कदम यांनी म्हटलं आहे. मात्र महिलांनी कुठल्याही प्रकारे शिविगाळ केला नसल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झालं आहे. विनम्रतेचा आभाव असणाऱ्या आणि महिलांबद्दल आदरभाव नसणाऱ्या या आमदाराचं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय करणार असा प्रश्न आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.