पुणे : पुण्यातल्या मारुंजी इथं शिवशक्ती संगम या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक दिवसीय शिबीर होतंय. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण एक लाख ६० हजार स्वयंसेवकांनी शिवशक्ती संगमसाठी नोंदणी केलीय. त्यात तरूणांची संख्या मोठी आहे.
हे सगळे स्वयंसेवक पूर्ण गणवेशात संघस्थानावर उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ५० हजार नागरिक तसंच मान्यवर या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून य़ेणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या शौर्यशाली इतिहासाचं स्मरण करत संघविचार समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.
संपर्काच्या माध्यमातून कार्यविस्तार साधणं तसंच देशविघातक शक्तींना सज्जन शक्तीचं दर्शन घडवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या एकदिवसीय शिबिरासाठी 35 विविध खात्यांच्या माध्यमातून 8 हजार स्वयंसेवक गेल्या अनेक महिन्यांपासून झटतायत.