www.24taas.com, झी मीडिया, पुणे
नवी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोललेत. यापुढी तुम्ही टोल भरायचा नाही. जर कोणी मागितला तर त्याल तुडवा, असा नारा दिला. राज यांचा आदेश मिळताच राज्यात टोलफोडचा भडका उडाला. त्यानंतर या आंदोलनावरून राज यांच्यावर चोहोकडून टीकेचा मारा झाला. राज आज एका जाहीर कार्यक्रमात आले खरे; मात्र, त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. मी जे काही बोलणार आहे ते ९ तारखेला बोलेन, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे ते काय बोलणार, याबाबत उत्सुकता आहे.
एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला राज यांनी हजेरी लावली. त्यावेळी या सोहळ्यात बोलताना राज सध्याच्या राजकीय घडामोडींवर काही भाष्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी बोलण्याचे टाळले. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी सत्ता आणि सिंहासनाचा उल्लेख केला, पण तो कादंबरी व चित्रपटाच्या अनुषंगाने होता. अरुण साधू यांच्या सिंहासन कादंबरीचे त्यांनी कौतुक केले.
राज यांची दमबाजी
नागरिकांचे हित आणि शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी, विकासाच्या कामांसाठी तुम्ही इतर पक्षांना मदत केलीत तर चालेल; पण नको त्या बाबतीत इतर पक्षांबरोबर सलगी कराल, तर याद राखा, अशा शब्दात राज ठाकरे यांनी शनिवारी स्वपक्षीय नगरसेवकांना झापले.
महापालिका निवडणुकीतील यशामुळे पक्षातील गटबाजी वाढली आहे. तुमची ही गटबाजी मी खपवून घेणार नाही, असेही त्यांनी या वेळी सुनावले. राज तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून शुक्रवारी त्यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर शनिवारी पुण्यातील नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी नगरसेवकांच्या कामाबाबत झाडाझडती झाली. सर्वांच्या कामगिरीचा आढावा राज यांनी या वेळी घेतला.
यापूर्वी पुण्यात चांगले काम झाले होते. तेव्हा आपले आठ नगरेसवक होते. त्यांनी चांगले काम केल्यामुळे आपली संख्या आता अठ्ठावीस झाली आहे. लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या प्रभागात चांगली विकासकामे झालीच पाहिजेत, अशा शब्दांत राज यांनी सर्वाना समज दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ