www.24taas.com, झी मीडिया, सातारा
मराठेशाहीचे खंदे शिपाई आणि पेशवाईचे धुरंधर सरदार महादजी शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील राजवाड्याचा जीर्णोद्धार होणार आहे. यासाठी २ कोटी ३३ लाख ६९ हजार ७७२ रुपयांची प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषणा केली.
श्रीमंत महादजी शिंदे यांचा इतिहास हा मराठे शाहीतील मैलाचा दगड असून, त्यांनी मराठी राजवट अटकेपार पोचवली. त्यांच्या या अलौकिक अशा कार्याची आठवण महाराष्ट्रासह देशातील जनतेला राहावी, त्यांच्या कार्याची आदर्श नव्या पिढीने घ्यावा, या हेतूने त्यांच्या मूळ गावी कण्हेरखेड येथे असलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वाड्याच्या जीर्णोद्धाराची संकल्पना महादजी यांचे वंशज असलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्यराजे शिंदे यांनी कण्हेरखेड येथील कार्यक्रमात मांडली होती.
त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. चव्हाण ही संकल्पना उचलून धरताना त्यासाठी निधी मंजूर करण्याची ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी नुकतीच सांस्कृतिक व कार्य विभागातील ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे किल्ले व धार्मिक स्थळे यांची देखभाल व संरक्षण या लेखाशीर्षकाखाली २ कोटी ३३ लाख ६९ हजार ७७२ रुपयांची प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.