www.24taas.com,पुणे
जलसिंचनाची श्वेतपत्रिका काढण्यावरून आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर तडकाफडकी उपमुख्यमंत्री पदावर असणारे अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विरोधकांच्या हिटलिस्टवर असणारे अजित पवार यांची पाठराखण राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. काका पुतण्याच्या बचावासाठी धावले असल्याचे पुण्यातील राष्ट्रीय अधिवेशनात दिसून आले.
जलसिंचन खात्यातील भ्रष्टाचारावरुन अजित पवार यांना लक्ष्य केले जात असताना, शरद पवार यांनी त्यांचा बचाव केला आहे. निकृष्ट कामांना नेते कसे जबाबदार, असा सवाल करत शरद पवार यांनी राज्याच्या सिंचन क्षेत्रात सात टक्के वाढ झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी अजित पवारांवरील आरोपांचे खंडन केले.
जलसंपदा खात्याला जाणीवपूर्वक लक्ष केले जात असल्याचा टोला शरद पवार म्हणाले. त्याचवेळी शरद पवारांनी लवासाचेही समर्थन केले. लवासामुळे राज्याचा फायदाच झाला आहे, असे ते म्हणाले. विकास करताना टीका होत असते त्यामुळे या टीकेकडे जास्त लक्ष देण्याची गरज नसल्याचे मत पवारांनी व्यक्त केले. पुण्यातील अधिवेनाला अजित पवारही उपस्थित होते. बडोदे येथील राष्ट्रीय अधिवेशनाला अजित पवारांच्या अनुपस्थितीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु असल्याची चर्चा सुरु होती.