www.24taas.com, पुणे
पिंपरी- चिंचवडमध्ये मोठा गाजावाजा करत सुरु झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवरून राजकारण चांगलंच तापलंय. या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तानाजी खाडे यांनी लाखो रुपये उकळून बनावट लाभार्थीना घर दिल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. तर दुसरीकडे पैसे घेतल्याचं सिद्ध झालं तर थेट राजकारण सोडेन, असा इशारा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेनं निगडीच्या सेक्टर २२ मध्ये जवळपास तीन हजार चारशे एकसष्ट घरांचा प्रकल्प पूर्ण केलाय. त्यात जवळपास दोन हजार सातशे २६ लाभार्थी राहायलाही गेले आहेत. या प्रकल्पात आणखी ७४२ जण राहण्यासाठी पात्र आहेत. त्यामधले १४० हून जास्त लाभार्थी बनावट असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. स्थानिक नगरसेवकांनी लोकांकडून लाखो रुपये उकळून ही घरं विकल्याचंही शिवसेनेचं म्हणणं आहे.
दुसरीकड राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तानाजी खाडे यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत...शिवसेनेचे नेतेच खंडणी गोळा करण्याचं काम करत असल्याचा पलटवार त्यांनी केलाय. मी कुणाकडून पैसे घेतल्याचं सिद्ध झालं तर राजकारण सोडून देईल, असा दावा त्यांनी केलाय.
वास्तविक पहाता झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवरून पिंपरी चिंचवड मध्ये गेले कित्येक दिवस राजकारण रंगतंय. पण या सगळ्या राजकारणात खरे लाभार्थी मात्र घरापासून वंचित आहेत.