www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामाविरोधात सुरु असलेल्या कारवाईला शनिवारी हिंसक वळण लागलं. तळवडे भागात संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. तर त्यानंतर पोलिसांनी नागरिकांवर लाठीचार्ज केला. अनधिकृत बांधकामाच्या मुद्यावरून पिंपरीतलं वातावरण तापलं असून आयुक्त श्रीकर परदेसी मात्र अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या भूमिकेवर ठाम आहेत.
नागरिकांचा उद्रेक पिंपरी-चिंचवडमधल्या तळेवडे भागातल्या अनधिकृत बांधकामाविरोधात सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात होता. न्यायालयाच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवडमध्ये मार्च २०१२ नंतरच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवण्याची जोरदार मोहीम पालिकेनं हाती घेतलीय. जीवे मारण्याची धमकी आल्यानंतरही आणि नगरसेवक-आमदारांचा विरोध असतानाही आयुक्त कारवाईच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळं वाल्हेकरवाडी आणि तळवडे भागात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरु होती. मात्र या कारवाईला स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध करत पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळं परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
उपमुख्यमंत्री आणि पिंपरी-चिंचवडचे सर्वेसर्वा अजित पवार आयुक्त श्रीकर परदेसींच्या पाठिशी असल्यानंच अतिक्रमणविरोधी कारवाई सुरु ठेवल्याचं सांगण्यात येतंय. कारवाईविरोधात ग्रामस्थांमध्ये संताप असल्यानं हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता आहे.