महायुतीचा 'माढा'चा तिढा सुटला

महायुतीत माढाचा तिढा अखेर सुटला आहे. कारण माढातून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे.

Updated: Mar 2, 2014, 09:48 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महायुतीत माढाचा तिढा अखेर सुटला आहे. कारण माढातून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईत जागावाटपाची घोषणा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात केली. महायुतीच्या शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय आला. माढ्यातून शेतकरी कामगार संघटनेचे सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आलीय. माढा मतदारसंघातून यापूर्वीही सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवली होती.
तर या मतदारसंघातून इच्छुक असलेले महादेव जानकर बारामतीमधून सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. महादेव जानकर यांनी लोकसभेच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली होती. तसंच साताऱ्याची जागा रामदास आठवलेंच्या आरपीआयसाठी सोडण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, सदाभाऊ खोत माढ्यातून आणि महादेव जानकर बारामतीमधून लढण्यासाठी सिद्ध झालेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना हारवून 'जायंट किलर' व्हायची आपली इच्छा असल्याचं जानकर म्हणाले तर खोत यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करणार असल्याचं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.