मकाऊ : भारताची युवा बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने मकाऊ ओपनमध्ये रविवारी हॅट्ट्रिक साजरी केली. अंतिम सामन्यात जपानच्या मिनात्सू मितानीवर दिमाखदार विजय मिळवत तिने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद मिळवले.
जागतिक स्पर्धेत दोनवेळा कांस्यपदक पटकावण्याचा मान मिळवणाऱ्या सिंधूने या संपूर्ण स्पर्धेत लौकिकाला साजेसा खेळ केला. अंतिम सामन्यात तिने सहाव्या सीडेड जपानच्या मितानीवर २१-९, २१-२३, २१-१४ असा तीन गेममध्ये विजय मिळवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
पहिल्या गेममध्ये सिंधूने दमदार खेळ करताना चांगली आघाडी घेतली आणि ही आघाडी शेवटपर्यंत टिकवत तिने गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये दोघींमध्ये चांगली चुरस रंगली. मात्र अखेरच्या क्षणात मितानीने बाजी मारत १-१ अशी बरोबरी साधली.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये मात्र सिंधूने मितानीला डोके वर काढूच दिले नाही. सिंधूने तिच्याविरुद्ध १७-९ अशी मोठी आघाडी घेतली. मितानीने पाच गुण मिळवत थोडीफार चुरस देण्याचा प्रयत्न केला. मात्र सिंधूच्या खेळापुढे ती निष्प्रभ ठरली आणि अखेरच्या गेममध्ये विजय मिळवत सिंधूने जेतेपदावर नाव कोरले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.