मुंबई: भारतात होणारा टी-20 वर्ल्ड कप आता अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला आहे, पण या स्पर्धेवर अनिश्चिततेचं सावट पसरलं आहे. वर्ल्ड टी-20 च्या या मॅचसाठी अजूनपर्यंत तिकीटही जारी करण्यात आलेली नाहीत.
8 मार्चपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेमध्ये 16 देश सहभागी होणार आहेत. पहिल्यांदाच भारतामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पण या स्पर्धेच्या यशाविषयी आत्ताच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे त्यांच्या बोर्डाबरोबर कराराचा वाद सुरु आहे, हा वाद मिटला नाही तर वेस्ट इंडिजचे प्रमुख खेळाडू या वर्ल्ड कपमध्ये भाग घेणार नाहीत, तर या स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आलेल्या दिल्लीच्या फिरोज शहा कोटला मैदानालाही अजून मॅच खेळवण्यासाठी परवानगी मिळालेली नाही.
तर सुरक्षेचं कारण देत पाकिस्ताननं या स्पर्धेवर बहिष्कार टाकायचा सूर आळवला आहे, आणि स्पर्धेतल्या सहभागाबाबत संभ्रम कायम ठेवला आहे.
याआधी वेस्ट इंडिज आणि पाकिस्ताननं एक वेळा टी-20 चा वर्ल्ड कप जिंकला आहे, त्यातच आता या दोन तगड्या टीमच्या समावेशाविषयीच अजून संभ्रम कायम आहे. त्यामुळे हा टी-20 वर्ल्ड कप प्रेक्षकांना कितपत आकर्षित करणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.