मुंबई : आज टी20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा सेमीफायनल मुकाबला रंगणार आहे. पण, या मॅचसोबतच काही जुन्या आठवणीही क्रिकेट रसिकांच्या मनात कायम आहेत.
क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनं आपल्या जवळपास प्रत्येक खेळीला नवनवे रेकॉर्डस बनवले... पण, त्याच्या आयुष्यात एक दिवस असाही आला ज्यामुळे तो हमसून हमसून रडला होता... ही वेळ सचिनवर वेस्ट इंडिज विरुद्धच्या मॅचनंतर आली होती.
31 मार्च 1997 मध्ये बारबाडोस टेस्टमध्ये सचिनच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये भारताला वेस्ट इंडिजकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 120 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करता करता टीम इंडिया केवळ 81 रन्सवर ऑल आऊट झआली होती.
आपल्या कॅप्टन्सीच्या काळात सचिनला काही फारसं यश मिळालं नव्हतं. सलग अनेक मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. याच दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्धच्या या पराभवानंतर सचिननं क्रिकेटला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता.
'हा पराभव म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील आणि आपल्या करिअरमधला सर्वात वाईट दिवस होता', असं खुद्द सचिननं 'प्लेइंग इट माय वे' या आपल्या पुस्तकात म्हटलंय. यामुळे, सचिनचा आत्मविश्वास कोसळून पडला होता. जवळपास दोन दिवस आपण स्वत:ला रुममध्ये कोंडून हमसून हमसून रडत काढले, असं सचिननं म्हटलय.
'मला पराभवाचा तिटकारा होता. कॅप्टनच्या रुपात टीमच्या खराब प्रदर्शनासाठी मी स्वत:ला जबाबदार मानत होतो. सलग मॅचमध्ये पराभव झाल्यानं मी हताश झालो होतो. यापेक्षाही भयंकर होतं... यातून बाहेर कसं पडावं याचा मार्गच सापडत नव्हता. यातून बाहेर पडण्यासाठी मला खूप वेळ लागला. त्यावेळी मी खेळापासून पूर्णपणे बाहेर पडण्याचा विचार करत होतो' असं सचिननं आपल्या पुस्तकात म्हटलंय.