मुंबई: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा तीन विकेटनी विजय झाला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेली ही रोमहर्षक मॅच शेवटच्या बॉलपर्यंत चालली.
144 रनचा पाठलाग करताना गुजरात ही मॅच सहज जिंकेल असं वाटत होतं, पण मिचेल मॅकलेनघननं 4 ओव्हरमध्ये 21 रन देऊन 4 विकेट घेत मुंबईला या मॅचमध्ये कमबॅक करून दिला, पण मुंबईला विजय मात्र मिळवता आला नाही.
ऍरोन फिंचनं 53 बॉलमध्ये नाबाद 63 रन करून गुजरातला हा सामना जिंकवून दिला. त्याला साथ दिली ती गुजरातचा कॅप्टन सुरेश रैनानं. रैनानं 22 बॉलमध्ये 27 रन केल्या. शेवटच्या ओव्हरला 11 रनची आवश्यकता असताना धवल कुलकर्णीनंही फोर मारून गुजरातला लक्ष्याच्या जवळ आणलं.
या मॅचमध्ये टॉस जिंकून गुजरातनं मुंबईला पहिले बॅटिंगला पाठवलं. पण सुरवातीलाच रोहित शर्मा आणि वन डाऊन आलेला हार्दिक पांड्या आऊट झाले. तळाला आलेल्या कृणाल पांड्याच्या नाबाद 11 बॉल 20 आणि टीम साऊथीच्या 11 बॉल 25 मुळे मुंबईला 143 रनपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून पार्थिव पटेलनं सर्वाधिक 34 रन केल्या.
गुजरातकडून धवल कुलकर्णी आणि प्रविण तांबेनं प्रत्येकी 2 तर जकाती, फॉकनर आणि ब्राव्होनं प्रत्येकी एक विकेट घेतली.
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेली गुजरात लायन्स जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आत्तापर्यंतच्या खेळलेल्या तिन्ही मॅचमध्ये गुजरातचा विजय झाला आहे. यामुळे गुजरात लायन्स पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर मुंबई मात्र 3 सामन्यांमधल्या 2 पराभवांमुळे सहाव्या क्रमांकावर आहे.
यंदाच्या मोसमात घरच्या मैदानात झालेल्या आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याआधी पुण्यानं मुंबईला वानखेडे स्टेडियमवर हरवलं होतं.