कोलकता: टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं इंग्लंडला धुळ चारली. वेस्ट इंडिजच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो मार्लोन सॅम्युअल्स. या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताबही सॅम्युअल्सलाच देण्यात आला. यावेळी सॅम्युअल्स ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्नवर चांगलाच भडकला.
मी हा पुरस्कार शेन वॉर्नला समर्पित करतो. मी बॅटनं उत्तर देतो, माईकवरून नाही, असा टोला सॅम्युअल्सनं वॉर्नला लगावला.
मी सकाळी उठलो तेव्हा माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता. शेन वॉर्न एकसारखं बोलत असतो. त्याला मी एवढच सांगू इच्छितो की हे तुझ्यासाठी आहे. असं सॅम्युअल्स म्हणाला.
मी जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज खेळत होतो, तेव्हाही शेन वॉर्नला माझ्याबद्दल समस्या होती. याचं कारण मला माहिती नाही, मी त्याचा कधीच अपमान केला नाही. त्याच्या मनात बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या बाहेर येण्याची आवश्यकता आहे. माझा चेहरा असली आहे त्याचा नाही, अशी टीका सॅम्युअल्सनं वॉर्नवर केली आहे.