दुबई : गोलंदाजीच्या वादग्रस्त स्टाईलमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निलंबनाची कारवाई झालेल्या सुनील नारायणला वेस्ट इंडीजच्या संघाने आगामी ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या संघात स्थान दिले आहे. या संघाचे नेतृत्व डॅरेन सॅमीकडे राहणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेदरम्यान पंचांनी नारायणच्या गोलंदाजीच्या स्टाईलची तक्रार केली होती. त्यानंतर चाचणीतही शैलीत दोष आढळल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याला निलंबित केले होते.
गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेसाठीच्या संघातही नारायणची निवड झाली होती. त्यावेळीही गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप असल्यामुळे नारायणने विश्वकरंडक स्पर्धेतून माघार घेतली होती.
वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाशी झालेल्या वादामुळे एकदिवसीय संघातून वगळलेल्या ड्वेन ब्राव्हो आणि किएरॉन पोलार्ड यांनाही वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवडले आहे.