सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 सीरिज भारतानं 2-0 नं याआधीच खिशात टाकली आहे. पण रविवारी होणाऱ्या तिसऱ्या टी-20 मध्ये भारतीय टीम मैदानात उतरेल ती ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश करण्यासाठी. वनडेमध्ये झालेल्या पराभवाचा व्याजासकट बदला घेण्याची ही चांगली संधी धोनीच्या शिलेदारांपुढे असणार आहे.
तिकडे ऑस्ट्रेलियाच्या अडचणी मात्र काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. कांगारुंचा कॅप्टन ऍरोन फिंचला दुखापत झाल्यामुळे तो या मॅचला मुकणार आहे. फिंचऐवजी शेन वॉटसनकडे या मॅचचं नेतृत्व असणार आहे.
भारतासाठी मात्र टी-20 वर्ल्ड कपआधी नवे प्रयोग करण्याची ही चांगली संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी-20 सीरिजमध्ये युवराज सिंगनं पुनरागमन केलं आहे. पण पहिल्या दोन्ही मॅचमध्ये युवीला बॅटिंगची संधीच मिळाली नाही. युवराजला वरती खेळायला न पाठवल्यामुळे धोनीवर टीका होत आहे. त्यामुळे सिडनीमध्ये होणाऱ्या शेवटच्या टी-20 मध्ये तरी धोनी युवराजला वरच्या क्रमांकावर पाठवणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे ?