www.24taas.com, नवी दिल्ली
सरकारनं मोबाईल कॉल्स ‘रोमिंग फ्री’करण्याच्या अगोदरच टेलिकॉम कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू झालेली दिसतेय. तसे संकेतही मार्केटमध्ये दिसून आलेत.
केंद्र सरकारनं केलेल्या घोषणेनुसार, लवकरच रोमिंग फ्री आणि एक देश, एक नंबर योजना लागू करण्यात येणार आहे. अशावेळेस अगोदर चिंतेत पडलेल्या मोबाईल कंपन्या आता मात्र सरकारनं हा नियम लागू करण्याआधीच अशा सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी सरसावल्या आहेत.
टेलिकॉम ऑपरेटर `एअरसेल`नं आपल्या एका स्पेशल व्हाऊचरमध्ये ‘रोमिंग फ्री’सुविधेबरोबरच ‘एक देश, एक किंमत’ योजना लागू केलीय. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार रोमिंग फ्रीबरोबरच अशा पद्धतीचा टेरिफ प्लान पहिल्यांदाच जाहीर करण्यात आलाय.
टेलिकॉम इंडस्ट्रीच्या अभ्यासकांच्या मते इतर मोबाईल कंपन्याही या स्पर्धेत लवकरच उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सरकारनं रोमिंग फ्री आणि एक देश, एक नंबर योजना लागू करण्याच्या अगोदरच तुम्हाला मोबाईल कंपन्यांच्या अशा पद्धतीच्या काही योजना तुमच्यासमोर आल्या तर आश्चर्य वाटायला नको!