अमोल देठे, www.24taas.com, मुंबई
महागडे फोन्स आणि महागडी गॅजेटस.... आजकाल हे स्टाईल आणि स्टेटस सिम्बॉल झालंय. पण जेवढी ही महागडी गॅजेट्स तेवढंच ती चोरीला गेल्यावर किंवा हरवल्यावर होणारं दुःखंही जास्त. पण आता या सगळ्यावर पर्याय शोधलाय विमा कंपन्यांनी. आता तुमच्या मोबाईल्ससाठीही विमा मिळणार आहे....
आजच्या काळात मोबाइल हा जगण्याचा अविभाज्य भाग होऊन गेलाय. मोबाइलशिवाय एक दिवसही काढणं, ही कल्पनाही करणं अशक्य आहे. फोन जितका महागडा, तितकंच तो हरवल्यावर किंवा खराब झाल्यावर होणारं दुःख जास्त.... म्हणूनच विमा कंपन्यांनी आता मोबाईलसाठीही विमा पॉलिसी आणलीय.
तुमचा मोबाईल जर 5000 रुपयांचा असेल तर वर्षभरासाठी अडीचशे रुपये प्रीमियम भरावा लागेल. मोबाईल 5000 ते 10000 दरम्यानचा असेल तर प्रीमियमची रक्कम आहे 425 रुपए... दहा ते पंधरा हजारापंर्यंतचा मोबाईल असेल तर साडे पाचशे रुपयांचा प्रीमियम भरण्याची तयारी ठेवा, 15000 ते 25000 दरम्यानच्या फोनसाठी 750 रुपये तर 25000 ते 40000 रुपयांच्या फोनसाठी 1 ते अडीच हजार इतका प्रीमियम वर्षाकाठी भरावा लागणार आहे.
मोबाइल विमा हा ग्राहकांसाठी सोयीचा पर्याय ठरणार आहे. आगीमुळे झालेलं मोबाईलचं नुकसान, मोबाईलची चोरी, दहशतवादी घटनांमध्ये मोबाईलचं नुकसान अशा परिस्थितींमध्ये मोबाईलला विम्याअंतर्गत संरक्षण मिळणार आहे. विम्याचा दावा करण्यासाठी मोबाईल हरवल्यावर किंवा खराब झाल्यावर लगेचच विमा कंपनीला कळवणं गरजेचं आहे. फोनची रिसीट आणि पोलिसांच्या FIR ची कॉपी द्यावी लागणार आहे.