फेसबुक-ट्विटरवर महिलांची चालूगिरी...

फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर महिला साफ-साफ खोटं बोलतात, आपल्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करून सांगतात... असा निष्कर्ष नुकताच एका सर्व्हेतून काढण्यात आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 14, 2013, 01:07 PM IST

www.24taas.com, लंडन
फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर महिला साफ-साफ खोटं बोलतात, आपल्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करून सांगतात... असा निष्कर्ष नुकताच एका सर्व्हेतून काढण्यात आलाय. इतरांसमोर आपलं आयुष्य किती रोमहर्षक आणि रोमांचक आहे हे दाखविण्यासाठी त्या असं करतात, असंही या सर्व्हेतून उघड झालंय.
‘वन पोल सर्व्हे’च्या वतीनं करण्यात आलेल्या या अभ्यासामध्ये जवळजवळ २००० महिलांना विविध प्रश्न विचारले गेले. यामध्ये चारपैकी एका महिलेनं महिन्यातून किमान एकदा तरी सोशल साईटवर आपल्याबद्दल खोटी माहिती दिल्याची कबुली दिली. महिला कोणत्या बाबतीत सर्वात जास्त खोटं बोलतात, याचा तुम्हाला अंदाज असेलच... नाही का? होय, महिलांना आपल्या ठिकाणाबद्दल जाहीर वाच्यता करणं पसंत नाही. त्यांनी बऱ्याचदा आपल्या ठिकाणाबद्दल चुकीची माहिती वेबसाईटवर दिलीय. म्हणजेच त्या घरी एकट्या असल्या की फेसबुकवर भासवतात की शहराबाहेर आहेत.

सोशल वेबसाईटवर खोटं बोलण्यामागे नेमकं काय कारण असावं? असा साहजिकच प्रश्न या अभ्यासकर्त्यांना पडला होता. त्याचं उत्तर मात्र त्यांना आणखी बुचकळ्यात टाकणारं मिळालंय. ‘द टेलिग्राफ’च्या मते, जेव्हा महिलांना वाटायला लागतं की त्यांचं आयुष्य बोअर होत चाललंय आणि नेमकं त्यांच्या परिचितांपैकी किंवा मित्र-मैत्रिणींच्या एक्साईटिंग अपडेटस् त्यांच्या नजरेसमोर येतं... तेव्हा त्यांचा जळफळाट होतो आणि म्हणूनच त्या सोशल साईटवर आपल्याबद्दलही खोटी माहिती देतात.