www.24taas.com,रत्नागिरी,नागपूर
सहा महिन्यांत पैसे दुप्पट देण्याचे आमिष दाखवून देशभरातील तब्बल दोन लाख लोकांना गंडा घालणाऱ्या नागपुरातील एका जोडप्याला रत्नागिरीत पोलिसांनी अटक केली आहे. बबली-बंटीच्या अटकेनंतर तब्बल ११०० कोटींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या बबली-बंटींने आणखी किती जणांना गंडविले त्याची माहिती अजून पोलिसांनी उघड केलेली नाही.
बंटी-बबलीने दामदुप्पट पैसे देण्याची स्कीम उघडली होती. या योजनेची अनेकांना भुरळ पडली. २०१०मध्ये दिल्लीत जाऊन ‘स्टॉक गुरू इंडिया’ नावाची कंपनी उघडली आणि देशभरातील तब्बल २ लाख ५ हजार लोक आमिषाला बळी पडले. गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रत्नागिरीत येऊन अटक केली. त्यामुळे येथील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
उल्हास प्रभाकर खैरे (३३) असून ११वी पास झालेला आहे. सहा महिन्यांत पैसे दुप्पट योजना सुरू केली. तीही थेट दिल्लीतून. याकामी पत्नी रक्षा जे. अर्स (३०) हिची मदत घेतली. दोघांनी नाव बदलून लोकेश्वथर देव आणि प्रियंका देव असे केले. दिल्लीत जाऊन ‘स्टॉक गुरू इंडिया’ नावाची कंपनी उघडली. त्यानंतर एप्रिल २०११नंतर हे जोडपे दिल्लीतून बेपत्ता झाले. त्यासाठी चक्क प्लॅस्टिक सर्जरी करून नावे बदलून अनेक शहरांतील गुंतवणूकदारांना गंडवत होते.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत नवी कंपनी काढून कोकणी माणसांना फसवण्याचे उद्योग त्यांनी सुरू केले होते. त्यासाठी सिद्धार्थ मराठे आणि प्रियंका मराठे अशी नावे त्यांनी धारण केली होतीत. विशेष म्हणजे दोघांनी प्लास्टिक सर्जरी करून घेतली होती.
उल्हास खैरे याने अवघ्या आठ वर्षांत कोट्यवधींची माया लोकांना गंडा घालून जमविली. २००४ मध्ये एक लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी उल्हासला नागपूर पोलिसांनी अटक केली होती. त्या गुन्ह्यातून जामीन मिळताच उल्हासने दामदुप्पट योजनेचे दुकान थाटून अब्जावधींची मालमत्ता जमा केली. या जोडप्याच्या नावावर ६३ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. वेगवेगळ्या बँकांमध्ये २३ कोटी जमा आहेत. दिल्ली, द्वारका, मुरादाबाद, भिवंडी, गोव्यात सहा फ्लॅट, बंगले आहेत. २०.४५ कोटींचा अनपेड डीडीही सापडला. लॅण्डक्रूझर, मर्सिडीज, पजेरोसारख्या बारा आलिशान गाड्या आहेत.