www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्यात बलात्काराच्या घटनेत वाढ झालेली दिसून येत आहे. जिल्ह्यात तीन बलात्काराच्या घटना उजेडात आल्या आहेत. दिवा येथे उपचार घेण्यास आलेल्या तरूणीवर डॉक्टरांने बलात्कार केला. तर दहिसरमधील काजुपाडा येथील एका मुलीला तिचा मैत्रिणीने फसवून कुंटखाण्याला विकले. दरम्यान तिच्यावर तिघांनी बलात्कार केला. दुसऱ्या एका घटनेत १० वर्षांचा मुलीवर शेजाऱ्यांने बलात्कार केला.
दिवा येथे मलेरियावरील उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला सलाइनमधून गुंगीचे औषध देत, डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना स्वस्तिक हॉस्पिटलात घडली. विल्यम्स जेकब असे नाव असलेल्या या डॉक्टरच्या विरोधात मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जेकब पसार झाला आहे.
२४ वर्षीय तरुणीला मलेरियाची लागण झाल्यानंतर, ती स्वस्तिक हॉस्पिटलात उपचारांसाठी दाखल झाली होती. २७ एप्रिल रोजी डॉ. जेकब याने सलाइनमधून या तरुणीला गुंगीचे औषध दिले. ही तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर जेकबने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार समजल्यानंतर तरूणीने आपल्या कुटुंबाला याबाबतीत सांगितले.
कुंटणखान्याला विकण्याआधी बलात्कार
एका अल्पवयीन मुलीवर पाच दिवस तिघांनी बलात्कार केल्याची तक्रार दहिसर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. मालाड येथील कुंटणखान्यात विकून तीन दिवस विवस्त्र ठेवल्याचा आरोपही मुलीने केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात अली असून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
दहिसरमधील काजुपाडा येथे राहणाऱ्या १६ वर्षांच्या या मुलीला तिच्या मैत्रिणीने वाढदिवसाच्या पार्टीसाठी २६ एप्रिल रोजी कांदिवली येथील भानुकरवाडीतील एका बंगल्यावर नेले. तिला मादक पेय देण्यात आले. त्यानंतर शुद्ध हरपल्यावर तिघांनी तिच्यावर पाच दिवस बलात्कार केला. त्यानंतर तिला मालाड येथील कुंटणखान्यात विकण्यात आले. पोलिसांनी मनोज गामते (४५), राधिका मेहता (२५) यांना अटक केली आहे.
घरात घुसून बलात्कार
डहाणू तालुक्यातील वेवजी गावातील एका दहा वर्षांच्या मुलीवर गावातल्याच तरुणाने तिच्या घरात घुसून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
तलासरी तालुक्यातील वेवजी गावातील तांगल पाड्यात राहणाऱ्या या मुलीच्या कुटुंबातील माणसे २० एप्रिल रोजी कामासाठी बाहेर गेली असता गावातच ताडीचा व्यवसाय करणारा मधु देवजी काकरा (२५) याने घरात घुसून मुलीवर बलात्कार केला.
मुलीने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. मात्र, नेमकी कुठे तक्रार करायची याची मुलीच्या आईला कल्पना नसल्याने आणि गावकऱ्यांनीही याबाबतीत सहकार्य करण्यास उदासीनता दाखवल्यामुळे या घटनेची तक्रार दाखल करण्यास विलंब झाला.