नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील महिलांच्या वेतनाचा मुद्दा चर्चेला आला आहे. कारण आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि पुरूषांच्या वेतनात मोठी तफावत दिसून आली आहे.
जगविख्यात सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ सत्य नाडेला यांनी आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना काम करा; पण वेतनवाढीची अपेक्षा करू नका, असा सल्ला जाहीर कार्यक्रमात दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते.
नाडेला यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर जगभरातील आयटीयन्स महिलांनी नाडेलांवर टीकास्त्र सोडल्यानंतर त्यांनी माफी मागितली होती. पण नाडेला यांच्या वक्तव्यामुळे आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या वेतनाचा मुद्दा चर्चेत आला होता.
आता अमेरिकेतील कॅटालिस्ट समूहाने केलेल्या सर्वेक्षणात आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी तफावत असल्याचे दिसून आले आहे.
कॅटालिस्टने जगभर केलेल्या संशोधनातून, तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आले आहे. हे केवळ आयटी सेक्टरचेच चित्र नाही, तर अन्य क्षेत्रांतही हीच स्थिती असल्याचे स्पष्ट झाले.
भारतामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला आपल्या करिअरला पुरुषांच्या बरोबरीनेच सुरवात करतात. प्रारंभी त्यांना दिले जाणारे वेतन आणि जबाबदाऱ्याही सारख्याच असतात. पण कालौघात त्यातील फरक वाढत जातो.
आपल्या बारा वर्षांच्या करिअरमध्ये महिला कर्मचारी वेतनवाढीच्या बाबतीत पुरुषांपेक्षा 3.8 लाख रुपयांनी पिछाडीवर पडत असल्याचे दिसून आले आहे.
विविध संघटनांमधील ही विषमता दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती आणि सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे "कॅटालिस्ट इंडिया डब्ल्यूआरसी‘च्या संचालिका शची इर्दे यांनी सांगितले.
काय आहे कॅटालिस्ट इंडिया?
"कॅटालिस्ट इंडिया डब्ल्यूआरसी‘ या समूहाच्या देशातील 58 कंपन्या सभासद असून 2011 मध्ये त्याची स्थापना झाली आहे.
अमेरिकेतील कॅटालिस्ट समूहाची 1962 मध्ये स्थापना झाली. महिलांना उद्योग क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून हा समूह काम करत असतो.
कॉर्पोरेट जगतामध्ये महिलांना काम करण्याच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात; संघटनांमध्ये त्यांच्यासाठी सर्वसमावेशक वातावरण निर्माण व्हावे यासाठी हा समूह काम करतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.