तिरस्कार, महत्वाकांक्षा, विश्वासघात, बदला, प्रेम आणि प्रेमासाठी त्यागाचा अविस्मरणीय प्रवास. सलीम-अनारकली, लैला-मजनू, हिर-रांझा, सोणी-महिवाल आणि रोमियो-जुलियट सारखाच प्रेमासाठी परमा आणि झोयाच्या संघर्षांची ही कहाणी. मात्र इतरांसारखीच असूनही सतत वेगळी वाटणारी आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी प्रेमकहाणी असंच इशकजादेचं वर्णन करायला हरकत नाही.
मुळात यशराज बॅनर आणि प्रेमकथा हे ठरलेले समीकरण. त्या प्रेमकथेला फुलवण्यासाठी लागणारे मटेरियलही विशिष्ट वातावरणात (कॉलेज, प्रवास, डान्स क्लास यासारखंच आणखी काही) निर्माण केले जाते. मात्र याबाबतीत इशकजादे जरा हटके आहे. हिंसक राजकारणाच्या माध्यमातून एका नाजूक प्रेमकथेचा प्रवास रेखाटला आहे तो खरच सुंदर आहे. अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांचा हा पहिलाच चित्रपट. मात्र या दोघा नवख्यांनी आपापल्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. अर्जुननं राजपूत घरातला टगेगिरी करणारा निमशहरी भागातला राजकारण्याचा माजुरडा पोरगा रंगवताना आपल्यातले टॅलेण्ट शंभर टक्के वापरल्याचे जाणवते. तर परिणितीनेही वागण्या-बोलण्यातून गुर्मी असणारी मुस्लीम आमदाराची डॅशिंग मुलगी झोया अप्रतिम रंगवलीय.
रागातून बदला आणि त्यातून निर्माण झालेला उतावीळपणा प्रेमातही कायम ठेवल्याने पीडिताचं आयुष्य झोयाच्या वाटेला येते. फुलासारखी वाढलेल्या लाडक्या झोयाला अनभिज्ञ असलेल्या ज्ञगाच्या क्रूर चेह-याची अनुभुती होते. मात्र झोया परिस्थितीशीच थेट दोन हात करण्याचे ठरवते तेव्हा तीच्या घरचेही तिची साथ सोडतात. एवढेच नव्हे तर तेच तिच्या जीवावर उठतात. अशा दुहेरी संकटातून होरपळून निघणारी झोया परिणितीसाठी अभिनयाची चांगली संधी देऊन गेली आणि परिणितीनेही त्याचे चीज केले.
मात्र या प्रेमकहाणीतून उत्तर प्रदेशातल्या राजकीय गुन्हेगारीवरही प्रकाश टाकला आहे. त्यामुळेच की काय यशराजच्या नेहमीच्या प्रेमकथा फुलवणा-या संगीताच्या सूर तालांना पिस्तूलच्या गोळ्यांच्या आवाजाही साज आहे. मात्र या ‘आवाजा’चा कालांतराने अतिरेक होत जातो. तो काही प्रमाणात गोंगाट वाटायला लागतो. मात्र हा गोंगाट लगेचच विस्मरणात जातो आणि लक्षात राहतात ते केवळ इशकजादे परमा-झोया आणि त्यांचे इश्क.