Pune Crime : पुण्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईलवर व्हिडिओ शूट रिक्षाचालकाने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली आहे. फायनान्स कंपनी तसेच खासगी सावकारांकडून त्रास दिला गेल्याचा आरोप करत रिक्षाचालकाने आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
तोहिद मेहबूब शेख असं या रिक्षाचालकांच नाव आहे. सकाळी 8.30 च्या दरम्यान हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. बघतोय रिक्षावाला संघटनेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तोहिद मेहबूब शेखने आत्महत्येपूर्वी शूट केलेला व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर तोहिदने इमारतीवरुन उडी घेत स्वतःला संपवलं.
आत्महत्येपूर्वी काय म्हणाला तोहिद?
"आज मी आत्महत्या करायला जात आहे. यासाठी जबाबदार आहेत. मी जिथे काम करायचो ते लोक माझा खूप छळ करायचे. त्यांनी माझा खूप छळ केला. कारण तर काही नव्हतं फक्त 500 रुपयांची चूक होती. त्यांनी काल माझ्या सासऱ्यांसमोर माझा खूप अपमान केला. मला आई बहिणीवरुन शिव्या दिल्या. मला मारून टाकायची धमकी देखील केली. अरबाज मेमन हा खूप वाईट माणूस आहे. तुम्ही कोंढव्यातील नाक्यावर कोणत्याची मजुराला जाऊन विचारा कशा शिव्या देतो. त्यांनी माझा तर खूप अपमान केला. तू कोणत्याही पोलीस ठाण्यात जा, पोलीस आयुक्तांकडे जा कोणीच माझ्याविरोधात तक्रार घेणार नाही असे तो बोलतो. मी माफी मागतो, अल्लाह मला माफ कर," असे तोहिदने शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीही बेकायदा सावकारी करणाऱ्याच्या त्रासामुळे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी भागात घडली होती. निलेश जंगम असे आत्महत्या केलेल्याचे नाव होते. याप्रकरणी बेकायदा सावकारी करणारा आरोपी सुहास दांडेकर, गोविंद मारुती भोपळे, वर्षा गोविंद भोपळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.