Guru Pournima 2022: हिंदू धर्मातील प्रत्येक सणांना महत्त्व असतं. गुरुपौर्णिमेला जितके धार्मिक महत्त्व आहे तितकेच ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. ग्रहांचं गोचर, नक्षत्र यामुळे या धार्मिक सणांवेळी विशेष योग तयार होतात. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षीची गुरू पौर्णिमा 13 जुलै 2022 रोजी आहे. या दिवशी वेदांचे रचनाकार वेद व्यास यांची जयंती साजरी केली जाते आणि त्यांची विशेष पूजा केली जाते. वेद व्यास यांना पहिले गुरु मानले जाते. त्यांनी मानवजातीला वेदांचे ज्ञान दिले. याशिवाय लोक या दिवशी आपापल्या गुरूंची पूजा आणि आदर करतात.
गुरुपौर्णिमा 4 राजयोग
ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून गुरुपौर्णिमा अधिकच खास आहे. या गुरुपौर्णिमेला ग्रहांची स्थिती अतिशय शुभ आहे. गुरुपौर्णिमेला मंगळ, बुध, गुरु आणि शनि अतिशय शुभ स्थितीत असतील. त्यामुळे गुरुपौर्णिमेला रुचक, भद्र, हंस आणि शश नावाचे चार राजयोग तयार होत आहेत. याशिवाय सूर्य आणि बुध एकाच राशीत असल्यामुळे बुधादित्य योगही तयार होणार. एकंदरीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेली उपासना-उपाय खूप शुभ फळ देतील.
गुरु पौर्णिमा शुभ मुहूर्त, उपासना पद्धत
हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्याची पौर्णिमा 13 जुलैच्या पहाटे 04:00 वाजता सुरू होईल आणि 13 जुलैच्या रात्री 12:06 पर्यंत राहील. गुरुची उपासना करण्यासाठी ज्योतिषीय उपाय करण्यासाठी संपूर्ण दिवस हा शुभ मुहूर्त असेल.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. घरातील मंदिरातच देवतांची पूजा करावी. भगवान विष्णू आणि वेद व्यास यांची पूजा करा. मग आपल्या गुरूंना तिलक लावून हार घालावा. गुरूंना भेटणे शक्य असेल तर जाऊन आशीर्वाद घ्या. आपल्या क्षमतेनुसार भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)