मुंबई : बुधवार पासून नूतन वर्ष सन २०२० मध्ये चाकरमान्यांसाठी सुट्यांची चंगळ,लीपवर्ष असल्याने कामासाठी वर्षात एक दिवस जास्त , खगोलप्रेमींसाठी कंकणाकृती सूर्यग्रहण दर्शन, सुपर मून दर्शन, ब्ल्यू मून योग , सुवर्ण खरेदी करणारांसाठी चार गुरुपुष्य योग, आश्विन अधिकमास आणि विवाहेच्छुकांसाठी भरपूर विवाह मुहूर्त आहेत असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यानी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना श्री. सोमण म्हणाले की यावेळी लीप सेकंद पाळला जाणार नसल्याने मंगळवार ३१ डिसेंबर रोजी रात्री ठीक १२ वाजता नूतन वर्ष २०२० सुरू होणार आहे. तसेच सन २०२० हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारीत २९ दिवस आल्याने या वर्षात एकूण ३६६ दिवस मिळणार आहेत. कामांची पूर्तता करण्यासाठी १ दिवस जास्त मिळणार आहे.
* सुट्ट्यांची चंगळ * कंकणाकृती सूर्यग्रहण * सुपर मून दर्शन * ब्ल्यू मून योग * आश्विन अधिकमास
* चार गुरुपुष्ययोग * भरपूर विवाहमुहूर्त * लीप वर्ष असल्याने कामाला एक दिवस जास्त मिळणार !
या नूतन वर्षात एकूण २४ सुट्ट्यांची चंगळ असणार आहे. प्रजासत्ताक दिन ( २६ जाने.), पारसी न्यू इयर ( १६ ऑगस्ट ), मोहरम ( ३० ऑगस्ट ), विजया दशमी (२५ ऑक्टोबर) या चारच सुट्ट्या रविवारी येणार आहेत. इतर २० सुट्ट्यांपैकी बकरी ईद( १ ऑगस्ट ), स्वातंत्र्य दिन ( १५ ऑगस्ट ) , श्रीगणेश चतुर्थी ( २२ ऑगस्ट) , दिवाळी लक्ष्मीपूजन ( १४ नोव्हेंबर ) या सुट्ट्या शनिवारी रविवारच्या सुट्टीला जोडून येणार आहेत. तसेच श्रीमहावीर जयंती ( ६ एप्रिल ) , रमजान ईद ( २५ मे ) , दिवाळी बलिप्रतिपदा ( १६ नोव्हेंबर ) , गुरुनानक जयंती ( ३० नोव्हेंबर ) या सुट्ट्या सोमवारी रविवारला जोडून येणार आहेत.
त्यापैकी २१ जूनच्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही भागातून दिसणार आहे. उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. १४ डिसेंबर रोजी होणारे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. १० जानेवारी व ५ जूनचे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. ५ जुलै व ३० नोव्हेंबरचे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाहीत.
७ एप्रिल रोजी रात्री आपणास सुपरमूनचे दर्शन होणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्र ३ लक्ष ५६ हजार ९०७ किमी. इतका पृथ्वीच्याजवळ आल्याने १४ टक्के मोठा व जास्त तेजस्वी दिसणार आहे. नूतन वर्षी १ व ३१ ऑक्टोबर रोजी अशा दोन पौर्णिमा आल्यामुळे ३१ ऑक्टोबरला ‘ ब्ल्यू मून ‘ योग आला आहे.
या नवीन वर्षात २ एप्रिल,३० एप्रिल,२८ मे आणि ३१ डिसेंबर असे चार गुरुपुष्य योग आले आहेत. या नवीन वर्षात एकही अंगारकी संकष्ट चतुर्थी येणार नसल्याने गणेश भक्तांची थोडी निराशा होणार आहे. सन २०२० मध्ये १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालात अधिक आश्विनमास येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचा भाद्रपद महिना झाल्यानंतर नवरात्र-घटस्थापना एक महिना उशीरा येणार आहे. त्यामुळे सन २०१९ पेक्षा दसरा-दिवाळी हे सण उशीरा येणार आहेत.
पंचांगकर्त्यांनी यावर्षींपासून गुरु-शुक्र अस्त कालात आणि चतुर्मासात काढीव गौण विवाह मुहूर्त देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सन २०२० मध्ये भरपूर विवाह मुहूर्त असल्याचे श्री. दा. कृ. सोमण यांनी सांगितले.