मुंबई : टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज, सलामीवीर रोहित शर्मा सध्या इग्लंड दौऱ्यावर आहे. कोरोनामुळे होऊ न शकलेल्या इग्लंडविरूद्ध पाचव्या कसोटी सामन्यासाठी तो तयारी करतोय. या दरम्यान रोहित शर्माने ने ट्विट केले आहे. या ट्विटवरून रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.
रोहित शर्माने 23 जून 2007 रोजी भारताकडून आयर्लंडविरुद्ध पदार्पण केले होते. पदार्पणानंतर मागे वळून न पाहता गोलंदाजांची धुलाई करत तो रो'हिट' शर्मा ठरलाय. गोलंदाजांना रोहित शर्मा नामक फलंदाजाची मैदानावर भीती वाटायला लागलीय. इतपत त्याचा मैदानात दरारा आहे.
आज रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त रोहितने ट्विटरवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
पोस्ट जशीच्या तशी
सर्वांना नमस्कार, आज मी भारतासाठी पदार्पण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण करत आहे. हा एक प्रवास आहे जो मी आयुष्यभर जपत राहीन.
मी या प्रवासाचा भाग असलेल्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो. मी खेळाडू बनण्यासाठी ज्यांनी मला मदत केली त्यांचे विशेष आभार. सर्व चाहत्यांचे, क्रिकेट प्रेमींचे आणि समीक्षकांचे संघावरील प्रेम आणि समर्थनाबद्दल आभार, असे त्याने म्हटले आहे.
रोहित शर्माच्या या ट्विटनंतर अनेक जण त्याला शुभेच्छा देत होते. तर काही जणांनी त्याच्यावर टीकाही केली.एक य़ुझरतर त्याच्या निवृत्तीवरचं पोहोचला. त्याने लिहले की, निवृत्तीच्या शुभेच्छा रोहित. आम्ही तुझी अजिबात आठवण काढणार नाही, अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.
वनडे-टी-20 रेकॉर्ड
रोहित शर्माच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आहेत. त्याने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 264 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये चार शतके झळकावली.
कामगिरी
रोहित शर्माने भारतासाठी 45 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये 8 शतकांच्या जोरावर 3137 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, 230 एकदिवसीय सामन्यांमध्ये 9283 धावा केल्या आहेत, ज्यात 29 शतकांचा समावेश आहे. T20 क्रिकेटमध्ये त्याने आपल्या बॅटने 3313 धावा केल्या आहेत.